Monday, Apr 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी अनिता जाधवने करायचं काय ?

अनिता जाधवने करायचं काय ?

Print
महाराष्ट्र टाइम्स
०३ ऑगस्ट २०१०
प्रगती बाणखेले

एचआयव्हीबद्दलच्या जागरुकतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही एचआयव्हीबाधित व्यक्तींना समाजात सामावून घेणं तर सोडाच पण साधी माणुसकीची वागणूक देण्याइतकीही मानसिकता अद्याप तयार झालेली नाही, याचे भयावह उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आले आहे. पतीच्या निधनानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून मुलांना जिद्दीने मोठे करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ३०वषीर्य अनिता जाधवचं(नाव बदलले आहे) जगणं गावकऱ्यांनी इतकं असह्य केलं की तीन वर्षांनंतर तिला अखेर गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अनिता लोंघे गावची रहिवाशी. गगनबावडा तालुक्यातील हे पाचशे लोकवस्तीचे गाव. तीन वर्षांपूवीर् तिचे पती चंदकांत एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. दोनच महिन्यांत त्यांचे निधन झाले. पदरी १२ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी. माहेरी कुणीही नाही. पतीच्या निधनानंतर केलेल्या तपासणीत अनिता आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि तिची परवड सुरू झाली. अनिता अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. अंगणवाडीत गावातील ४०-४५ मुलं. मुलांना तिच्यापासून संसर्ग होऊ शकतो असे सांगत गावकऱ्यांनी तिला अंगणवाडीत येण्यास मनाई केली. तू घरी बसून पगार घे असे त्यांचे म्हणणे. मुलांना काहीही धोका नाही, हे परोपरीने विनवूनही गावकऱ्यांचा हेका कायम होता. अनिता राजीनामा देत नाही हे बघून गावकऱ्यांनी मुले पाठवणे बंद केले. गावात वेगळी अंगणवाडी सुरू झाली. गाववर्गणीतून पगार देत नवी सेविका नेमली गेली. मुलेच नसलेल्या अंगणवाडीत रोज जाऊन करायचं काय हा प्रश्ान् अनितासमोर उभा होता.

सर्व प्रयत्न थकले

तिने कोल्हापूर नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल (एनकेपीप्लस) या एचआयव्हीसंबंधात काम करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी 'सीफार'च्या माध्यमातून जिल्हा सल्लागार समितीसमोर ५ डिसेंबर, २००९मध्ये हा विषय मांडला. अनितामुळे मुलांच्या आरोग्याला धोका नाही, हे अनेक बैठका घेऊन सांगूनही गावकऱ्यांचा प्रतिसाद शून्य होता.कोेल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे डॉ. शैलेश माने यांनी गावात हेल्थ कॅम्प घेतले. तहसीलदार विजया यादव तसेच आमदार चंददीप नरके यांनी समजूत काढूनही गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झालेले नाही.

मुलीला शाळेत प्रवेशही नाकारला

अनिताशी गावकऱ्यांचा संपूर्ण असहकार होता. मुलांना कुणी खेळायलाही घेत नसे. बसमध्ये तिच्या शेजारची जागा रिकामी ठेवली जाई. हा छळ सहन करणाऱ्या अनिताला आणखी जबर धक्का बसला तो या जूनमध्ये. सहा वर्षांच्या तिच्या मुलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊ देण्यास गावकऱ्यांनी मनाई केली. तिची मुलगी शाळेत आल्यास इतर मुलांच्या आरोग्याला धोका आहे हा त्यांचा हेका कायम आहे. मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने अनिताने अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

गावात परतायचंय

सध्या मुलांना घेऊन ती मुंबईत आली आहे. मावशीच्या कुटुंबाचा आधार घेत तिने तिने कामाचा शोध सुरू केलाय. एक दोन कामं मिळालीतही. पण तिला तिच्या हक्काच्या गावात, घरात परत जायचंय. तिला तिची नोकरी परत हवीय. काम करण्याचा, सामाजिक आयुष्य सन्मानानं जगण्याचा तिचा अधिकार, तिच्या मुलीचा शिक्षणाचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याचा गावकऱ्यांना काय अधिकार, हा तिचा प्रश्ान् आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya