३० नोव्हेंबर २०११
मुंबई भारत
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, समुपदेशन, एचआयव्हीबद्दल जनजागृती करण्यासाठी स्थानिक पातळीपासून केलेला प्रयत्न, यांच्या एकत्रित परिणामामुळे पाच वर्षांच्या तुलनेमध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2007 मध्ये 10.65 टक्के रुग्णांची एचआयव्हीसह जगणाऱ्यांमध्ये नोंद करण्यात आली होती, तर 2011 मध्ये हेच प्रमाण 5.84 टक्के एवढे कमी झाले आहे.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, या पाच वर्षांच्या तुलनेमध्ये सातत्याने घटणारे हे प्रमाण निश्चितच सकारात्मक लक्षण आहे. सन 2007 मध्ये गर्भवती महिलांमध्ये 0.91 टक्के महिलांना एचआयव्हीची लागण झाली होती, तर सन 2011 मध्ये हे प्रमाण 0.40 टक्के एवढे घटले आहे. रक्तदान करताना एचआयव्हीबद्दलच्या करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्येही लागण झालेल्यांचे प्रमाण 0.12 टक्के एवढे खाली आले आहे.
गेल्या दहा महिन्यांमध्ये एचआयव्हीबद्दल जागृती पसरवण्यासाठी 43 विविध योजना राबवण्यात आल्या. त्यातून 1 लाख 81 हजार 300 व्यक्तींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सन 2007 मध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्या 5420 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र नव्या सर्वेक्षणानुसार सन 2011 मध्ये 595 रुग्णांपैकी केवळ पंधरा जणांचा मृत्यू हा एचआयव्हीमुळे झालेला आहे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार मुंबईमध्ये रुग्णांची संख्या सन 2007 मध्ये 10.65 टक्के इतकी होती, तर सन 2011 मध्ये हेच प्रमाण 5.84 टक्क्यांनी घटले आहे. गरोदर महिलांमध्ये एचआयव्हीचे लागण होण्याचे प्रमाणही घटते आहे, ट्रक ड्रायव्हर, स्थलांतर करणारे लोक, समलिंगी व्यक्ती या एचआयव्हीमध्ये सर्वाधिक बाधित ठरणाऱ्या प्रत्येक घटकांस एचआयव्हीची लागण होण्याची कारणे व त्यावरील तातडीने सुरू करायचे उपचार यांचा एकत्रित परिणामामुळे हे प्रमाण घटले आहे.