Monday, Apr 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीत बागलकोट जिल्हा देशात तिसरा

एचआयव्हीत बागलकोट जिल्हा देशात तिसरा

Print
सकाळ वृत्तसेवा
०४ ऑगस्ट २०१०
भीमगोंडा देसाई
बेळगाव, भारत

कर्नाटकातील बागलकोट जिल्हा एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत देशात तिसरा आहे. नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (नॅको) अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. यामुळे या जिल्ह्यातील प्रत्येकाच्या घरात जाऊन एचआयव्ही व एड्‌ससंबंधी जनजागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक एचआयव्हीग्रस्त असलेल्या जमखंडी, मुधोळ या दोन तालुक्‍यांत अशा प्रकारचे जनजागृतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तालुक्‍यांत लवकरच जनजागृतीचे काम सुरू होणार आहे. या जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे येथे अधिक जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी राज्यातील आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थेच्या मदतीतून धडपडत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्‍यात 1986 मध्ये कर्नाटकात पहिला एचआयव्हीचा रुग्ण मिळाला. शासनाच्या आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचा जोरदार धडाका लावला. जनजागृतीवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करू लागले. एचआयव्हीग्रस्तांची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे या आजाराबद्दल सुशिक्षितांबरोबरचे अशिक्षितांमध्येही चांगली जनजागृती झाल्याचे दिसते.

एचआयव्हीबाधित व्यक्ती उपचारासाठी एआरटी केंद्रात खुलेपणाने येत आहेत. गर्भश्रीमंत एचआयव्हीग्रस्त काही लोक समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेत आहेत. उपचारांसाठी रुग्ण बाहेर येत असल्यामुळे कोणत्या गावात, तालुक्‍यात, जिल्ह्यात, राज्यात किती एचआयव्ही व एड्‌सग्रस्त लोक आहेत, याचा नेमका आकडा स्पष्ट होत आहे.

राष्ट्रीय पातळीवर नॅको प्रत्येक वर्षी कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या अधिक आहे, याचा अहवाल तयार करीत असते. जागृती व अन्य उपक्रम राबविण्यासाठी हा अहवाल तालुका पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तयार केला जातो. या वर्षी नॅकोने तयार गेलेल्या अहवालातून बागलकोट जिल्हा एचआयव्हीग्रस्तांमध्ये तिसरा क्रमांकावर तर आंध्र प्रदेशमधील कर्नुल जिल्हा पहिला आणि कडपा जिल्हा दुसरा असल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकातील बागलकोट जिल्हा असल्यामुळे शासनाने त्वरित येथे युद्धपातळीवर जनजागृतीच्या कामाला सुरवात केली. आठवड्यापूर्वी सिनेअभिनेत्री पूजा गांधी यांच्या हस्ते प्रत्येकाच्या घरात जाऊन एचआयव्ही व एड्‌सची माहिती सांगून जनजागृती करण्याचा मोहिमेला प्रारंभ झाला. अशा कार्यकर्त्या, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी हे काम करीत आहेत. सध्या दोन तालुक्‍यांतील जनजागृतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्‍यांतील प्रत्येक घरात जाऊन जागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पालकांपासून एचआयव्ही अधिक
प्रामुख्याने एचआयव्हीचा प्रसार वेश्‍या व्यवसायाच्या ठिकाणी तसेच असुरक्षित अनैतिक संबंधांद्वारे होत असतो; मात्र बागलकोट जिल्ह्याचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. वरील घटकांद्वारे लागण होण्याचे प्रमाण केवळ सहा टक्के तर आई-वडिलांपासून मुलांना एचआयव्ही होण्याचे सरासरी प्रमाण 41 टक्के आहे. ही टक्केवारी अधिक असल्याने, त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा अभाव व हॉस्पिटलमध्ये प्रसूती न होणे ही प्रमुख कारणे आहेत.

प्रमुख कारणे...
देवदासींची प्रथा, अठराविश्‍वे दारिद्य्र, शिक्षणाचा अभाव ही प्रमुख कारणे बागलकोट जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या अधिक असण्याला आहेत, असे स्वयंसेवी संस्थांकडून सांगण्यात येते.

काही गावांतील 80 टक्के लोकांना..
जिल्ह्यातील काही गावांतील 80 टक्के लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. त्यामुळे या गावात नवी सामाजिक व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या गावातील हा आजार कमी करणे आरोग्य विभागालाही आव्हानात्मक बनले आहे.

केवळ जागृतीमुळे...
जिल्हा आरोग्य नियंत्रण अधिकारी जनजागृतीच्या मोहिमेवर नियंत्रण आहे. घरा-घरांत जनजागृती केल्यामुळे मला एचआयव्हीच लागण झाली आहे, काय करायला पाहिजे, कोणती औषधे घ्यावीत अशा प्रश्‍नाचे दररोज सरासरी 100 फोन नियंत्रण अधिकाऱ्यांकडे येत आहेत. या वरून जनजागृतीचे महत्त्व ठळक झाले आहे.

आकडे बोलतात..
सध्याची तालुकानिहाय एचआव्हीग्रस्तांची संख्या : मुधोळ -3205, जमखंडी-2756, बदामी-1232, बागलकोट-1894, बिळगी -1325, हुनगुंद-1190.

एचआयव्हीग्रस्तांची संख्या अशी
वर्ष*संख्या
2003*1069
2004*1758
2005*2173
2006*1972
2007*3449
2008*4462
2009*5121
2010*11,602.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya