Monday, Aug 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्ही'बाधित मुलाचा विक्री'नंतर मृत्यू

एचआयव्ही'बाधित मुलाचा विक्री'नंतर मृत्यू

Print
सकाळ वृत्तसेवा
०३ जुन २०१०
पुणे, भारत

"एचआयव्ह'बाधित मुलाची बेकायदेशीररीत्या एक लाख रुपयांना विक्री करून, फसवणूक केल्याच्या आरोपावरून येरवडा पोलिसांनी गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेच्या अध्यक्षाला अटक केली आहे. या आरोपीला चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या मुलाचे आता निधन झाले आहे.

या प्रकरणी अनिता अरुण यादव (रा. गोरेगाव, मुंबई) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आश्रमाचा संचालक मॅथ्यू रायप्पा यानमल (वय 39, रा. जे. जे. चेंबर्स, चित्रा चौक, येरवडा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानमल हा गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याने यादव यांना, गेल्या वर्षी आश्रमातून एक मूल दत्तक दिले होते. त्या बदल्यात त्याने एक लाख रुपये घेतले होते. मुलगा दत्तक देण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी आवश्‍यक होती. ती न घेताच यानमलने मुलाचा ताबा यादव यांना दिला. हा मुलगा "एचआयव्ही'बाधित असल्याची माहिती यानमलला होती. ती माहिती त्याने यादव यांच्यापासून लपविली. हा मुलगा काही महिन्यांनंतर मरण पावला. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार यादव यांनी केली होती.

पोलिसांनी यानमलला अटक करून, बुधवारी न्यायालयात हजर केले. यादव यांना दत्तक दिलेले मूल कोठून आणले होते, ते कोणाकडून घेतले याची माहिती आरोपीकडून घ्यायची आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास दिली. गुरुकुल गोदावरी बालक आश्रमास मुले दत्तक देण्याची आणि सांभाळण्याचा परवाना नाही. त्या संदर्भात तपास करून संस्थेची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत, आरोपीने बेकायदेशीरपणे किती आणि कोणाला मुले दत्तक दिली याची माहिती गोळा करायची आहे, या संस्थेच्या इतर संचालक मंडळाचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे; तसेच आश्रमात असणाऱ्या बालकांविषयी माहिती गोळा करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी बेंडभर यांनी न्यायालयाकडे केली.

संस्था प्रथमपासूनच वादग्रस्त
येरवडा - महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील गुरुकुल गोदावरी बालकाश्रम संस्थेच्या स्वयंघोषित प्रमुखाने "एचआयव्ही'बाधित दत्तक दिलेल्या मुलाचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही संस्था आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा प्रकार आता उघड झाला असला, तरी ही संस्था प्रथमपासूनच वादग्रस्त असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र हौसिंग बोर्डातील महापालिकेच्या समाजमंदिरात एक वर्षापासून "गुरुकुल गोदावरी बालकाश्रम' मॅथ्यू नावाचा व्यक्ती चालवीत आहे. या बालकाश्रमाला एका माजी नगरसेविकेची आणि वडगाव शेरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षांची मदत आहे. या बालकाश्रमाला जिल्हा महिला व बालविकास विभागाची परवानगी नाही. याबाबत स्वत: महिला व बालविकास आयुक्तांनी संस्थेला नोटीस दिली होती. या संस्थेत एक ते सोळा वयोगटातील चाळीस ते पन्नास मुली-मुली राहतात. ही मुले कोठून आली आहेत, याबाबतची कोणतीच कागदपत्रे संस्थेत नाहीत. तसेच, आतापर्यंत दत्तक मूल देताना कायदेशीर कोणत्या बाबींची पूर्तता केली आहे, याचाही तपास नाही.

संस्थेला सरकारी अनुदान नसल्यामुळे संस्थेचा स्वयंघोषित प्रमुख मॅथ्यू देणगीदारांवर अवलंबून असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कित्येक वेळा संस्थेतील मुलांची उपासमार होत असल्याच्या तक्रारी आजूबाजूच्या नागरिकांनी केल्या आहेत. मागील वर्षी संस्थेतील एका तक्रारीची शहानिशा करायला गेलेल्या येरवडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांना मुले उपाशी असल्याचे आढळले होते. त्यांनी तत्काळ मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

गोदावरी बालकाश्रम संस्था पूर्वी कोठे होती याबाबत सांगण्याचे मॅथ्यू टाळत असत. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन ते आपला बिनबोभाट उद्योग चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या संस्थेत मुले किती होती, किती व कोणाला दत्तक मुले त्यांनी दिली, याबाबत पोलिसांच्या तपासाअंती आणखी धक्कादायक माहिती उजेडात येईल, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya