Saturday, May 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी 'एचआयव्ही'चे निदान आता १५ मिनिटांत

'एचआयव्ही'चे निदान आता १५ मिनिटांत

Print
महाराष्ट्र टाइम्स
२९ नोव्हेंबर २०११
पुणे भारत

पुण्यासह चौदा जिल्ह्यांतील 'पीएचसी'मध्ये मोफत सुविधा

आठ हजार परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञांना प्रशिक्षण सुरू मुस्तफा आतार पुणे

गर्भवतींसह टीबीच्या पेशंट्समध्ये 'एचआयव्ही'चे निदान करण्यासाठी आता जिल्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागणार नाही. प्राथमिक आरोग्य केंदासह (पीएचसी) उपकेंदामध्येच ही सुविधा मोफत उपलब्ध होणार असून अवघ्या पंधरा मिनिटांत बाधा झाली किंवा नाही याचे निदान होणार आहे.

राज्याच्या महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेने (एम-सॅक्स) हा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील आठ हजार कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येत असून पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा देण्यात येईल. पुण्यासह सातारा, सांगली, परभणी, चंदपूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, नागपूर, नाशिक, रायगड, लातूर, ठाणे या जिल्ह्यांत ही योजना सुरू होणार आहे,' अशी माहिती 'एमसॅक्स'च्या उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

' राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंदासह उपकेंदामध्ये ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसह पुरुष उपचारासाठी येतात. त्या वेळी त्यांना एचआयव्हीचे लागण झाली आहे किंवा नाही याची तपासणी करणे गरजेचे ठरते. प्रामुख्याने गर्भवती महिलांच्या बाबतीत हे महत्त्वाचे असून त्यांच्यामार्फत बाळाला लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन थेंब रक्ताच्या चाचणीतून हे अवघ्या पंधरा मिनिटांत निदान होणार आहे. त्यासाठी आठ हजार परिचारिका, टीबीचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय कार्यकतेर् यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील चौदा जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंदात ही योजना सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांत ही चाचणी सुविधा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यांत अन्य जिल्ह्यांमध्ये सुविधा सुरू होईल. 'एचआयव्ही' चाचणी ही सुविधा पूर्णत: मोफत मिळणार आहे. या संदर्भात लागणारे किट्स हे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (नॅको) पुरविणार आहे. विशेष करून संशयित पेशंट्सची 'एचआयव्ही'ची चाचणी निश्चितपणे केली जाणार असून त्यांना बाधा झाल्याचे निदान झाल्यास त्यांना जिल्हा हॉस्पिटलकडे पुढील उपचारासाठी पाठविणे शक्य होणार आहे.

सहा लाख महिलापर्यंत पोहोचणार

आतापर्यंत 'पीएचसी'च्या माध्यमातून पन्नास टक्के गर्भवती महिलांच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, सर्वच पेशंट्स पीएचसी नंतर ग्रामीण रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजाराचे निदान होणेे अशक्य होते. राज्यातील अठरा लाख गर्भवतींची 'एचआयव्ही' तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेे. त्यापैकी दहा लाख महिलांची तपासणी झाली असून, नव्या सुविधेमुळे आणखी सहा लाख महिलांची तपासणी करणे शक्य होईल. टीबीच्या पेशंटची तपासणी करताना १९ लाख पुरुषांच्या तपासणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असेही सांगण्यात आले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya