Monday, Apr 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी 'कुंपणावर'च्या माणसांना मिळाली जगण्याची उमेद

'कुंपणावर'च्या माणसांना मिळाली जगण्याची उमेद

Print
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
उत्तमकुमार इंदोरे
पुणे, भारत

""आधी कुठलंही समुपदेशन न करता तुम्ही "एचआयव्ही'बाधित आहात, असं डॉक्‍टरांनी थेट सांगितलं अन्‌ आभाळ कोसळल्याचा भास झाला... घरच्यांनी धसका घेतला, वडिलांनी तर बहिष्कृतच केलं... आयुष्यभराची साथ करण्याची शपथ घेतलेल्या पत्नीनेही मग समाजाच्या बोचऱ्या नजरांना कंटाळून स्वत:ची कायमची सुटका करून घेतली अन्‌ मी पोरका झालो... पण स्वत:ला सावरत, लढत माझ्यासारख्याच समदु:खी असलेल्या मैत्रिणीशी विवाह झाला अन्‌ पुन्हा जगण्याची उमेद मिळाली...!''

"एचआयव्ही'बाधित आदित्य (नाव बदलले आहे) आपल्या भावनांना वाट करून देत होते. त्याच आजाराने बाधित असलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही अशाच वेदना व्यक्त केल्या. "एचआयव्ही'बाधित असलेल्या व पहिल्या जोडीदाराची साथ सुटलेल्या अशा एक नव्हे, तब्बल बारा जणांनी "एचआयव्ही'बाधित जोडीदार निवडून जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे. समाजाच्या आणि जगण्या-मरण्याच्याही "कुंपणावर' असलेल्या या माणसांशी जागतिक एड्‌स दिनानिमित्त संवाद साधला, तेव्हा स्वत:च्या लढाईबरोबरच त्यांनी आणखी एका जीवनाची लढाई जिंकल्याचे जाणवले.

विवाहबद्ध झालेल्या या बाराही व्यक्ती पुणे जिल्हा, मुंबई आणि परिसरातील आहेत. मानव्य, अक्षदा, रोटरी क्‍लब आणि नेटवर्क ऑफ पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही या संस्थांनी त्यांना ही नवी उमेद दिली. या बारा जणांचे रूपांतर सहा दांपत्यांत करताना या संस्थांनी त्यांना स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्यामुळेच, तोपर्यंत स्वत:च्या आजाराकडे न्यूनगंडाने पाहणारी ही मंडळी त्यांच्या सामूहिक लग्नसमारंभात मोकळेपणाने बोलली. त्यांच्या विवाहाला आता चार महिने होतील, पण एकमेकांच्या आधाराने ही मंडळी इतर सर्वसामान्यांसारखा संसार करताहेत, हे त्यांच्याशी बोलल्यावर दिसले. अर्थात औषधोपचार आणि एकमेकांचा आधार सोबतीला आहेच.

या सर्वांत ग्रामीण भागातील आदित्य (नाव बदललेले) यांचा अनुभव मात्र बोलका होता. "1999 मध्ये मधुमेह असल्याचं प्रथम निदान झालं, पण त्यावरील गोळ्या खाऊ लागल्यावर त्रास वाढला, म्हणून रक्ततपासणी केली.

त्यात मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं डॉक्‍टरांनी थेट मलाच सांगितलं. मी कोसळलोच... पत्नीला आणि घरच्यांनाही मोठा धक्का बसला. घरी कुणी माझ्याशी बोलेनात... वडिलांनी तर घराबाहेर काढलं. त्यानंतर सुरू झाला संघर्ष... मित्र, नातेवाईक- साऱ्यांकडूनच मी एकटा पडलो... '' आदित्य सांगत होते. ""...तरीही मी लढत राहिलो माझ्या आजाराशी, आणि या आजारामुळे माणसाला वाळीत टाकणाऱ्या समाजाशीही. आधी मेकॅनिक होतो, पण काम होत नसल्याने ते सोडलं. मधल्या काळात पत्नीनेही "हा आजार आपल्यालाही होणार नाही ना?' या धसक्‍याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मी एका कंपनीत नोकरी मिळवली. तेथूनच नवनवे मित्र मिळाले- उभारी देणारे. माझ्यासारख्याच असलेल्या इतरांसाठी काम सुरू झालं आणि तिथेच मला समदुःखी मैत्रीण मिळाली. कालांतराने विवाहाचा निर्णय घेतला आणि मानव्य, रोटरी यांनी त्यात पुढाकार घेऊन आमची गाडी रुळावर आणली... पेपरमध्ये माझे नाव छापायलाही हरकत नाही...!'' हे सांगताना त्यांच्या आवाजाला एका विजेत्याचीच धार होती.

याबाबत "रोटरी'चे डॉ. राजेंद्र भवाळकर म्हणाले, ""जगण्याची पूर्ण उमेद तुटलेली माणसं आज यशस्वी जीवन जगताहेत. शिवाय त्यांच्या विवाहानंतरही आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. अत्याधुनिक औषधप्रणालीमुळे खरे तर अशा "एचआयव्ही'बाधित दांपत्यांनाही निरोगी अपत्य होऊ शकते. त्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या वर्षातही 12 फेब्रुवारीला आम्ही अशाच काही जणांचा विवाह लावणार आहोत.''

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya