Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी भेटीलागी जीवा अशीही लागते आस...

भेटीलागी जीवा अशीही लागते आस...

Print
भेटीलागी जीवा अशीही लागते आस...
रुग्णालयात सोडून गेलेला तिचा भाऊ पुन्हा परतलाच नाही. तिने मात्र, सतत त्याला भेटण्याचा धोषा लावलेला. रडून-रडून तिचे अश्रू सुकले तरी तिचा भाऊ आलाच नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बहिणीचा मृत्यू झाल्याचे खोटेच सांगितले. ती खात्री करून घेण्यासाठी आलेला भाऊ तिला भेटला, पण या भेटीत बोलणे काहीच झाले नाही. कारण भावाला भेटण्याच्या ध्यासाने तिची वाचाच गेली आहे. भावना उफाळून आल्या होत्या, पण शब्द फुटत नव्हते... अशी मन हेलावून सोडणारी एका बहिणीची ही करुणार्त भेट.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली ही महिला आपल्या माहेरी राहत होती. वेळोवेळी येणाऱ्या आजारपणामुळे डॉक्‍टरांनी तिला एचआयव्हीची तपासणी करण्याचा सल्ला दिला. तपासणीत तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे तिच्या अंगातील त्राण संपले. मानसिक त्रास सुरू झाला. गावी मोठ्या भावाचे छत्र होते; परंतु या रोगामुळे एके रात्री त्या पित्यासमान भावाने तिला घराबाहेर काढले. नेमकं जायचं कुठे, हा यक्षप्रश्‍न तिच्या समोर "आ' वासून उभा होता. शेवटचा आसरा होता, तो मुंबईला राहणाऱ्या छोट्या भावाचा. तिने थेट मुंबई गाठली. भावाला एचआयव्हीसंदर्भात समजल्यावर त्यानेही तिचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली. लोकांच्या भीतीने तिला घरात ठेवताही येत नव्हते आणि घराबाहेर काढणेही जमेना. त्यादरम्यान, कळंबोलीतील ज्योतीस केअर सेंटरमध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांची काळजी घेतली जात असल्याचे एका मित्राकडून समजले. तेव्हा आपल्या एचआयव्ही बाधित बहिणीला घरातील मोलकरीण असल्याचे सांगून छोट्या भावाने "ज्योतीस केअर सेंटर'मध्ये जून 2009 मध्ये दाखल केले. सेंटरमधील सोपस्कार पूर्ण करून तिच्या भावाने तेथून काढता पाय घेतला. डॉ. दिव्या मित्तल यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू झाले. रोगामुळे भावांनी दूर लोटले... सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांकडून साधी विचारपूसही होत नाही, आपण एकटे पडलो आहोत, या विचारांमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले. समोरच्या भिंतीकडे व छताकडे एकटक शून्य नजरेने ती पाहत राही. डॉ. मित्तल यांच्यासह ज्योतीस सेंटरच्या सिस्टर्स, नर्स, समुपदेशक धनश्री साळुंखे आदींनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. त्यावेळी तिचे मानसिक संतुलन ढासळल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मेंदूवर परिणाम होत होता. मानसिक, भावनिक संवेदना कार्यक्षम असताना तिच्या मनाने भावाला भेटण्याचा ध्यास घेतला होता. तिने डॉक्‍टरांकडे त्यासाठी तगादा लावला. तिची भावाला भेटण्याची ओढ पाहून ज्योतीसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने दिलेला पत्ता अर्धवट असल्याचे आढळून आले. मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर तो काहीतरी सबबी सांगून भेटायला येण्यास टाळाटाळ करू लागला. कित्येक दिवस वाट पाहूनही भाऊ न भेटल्यामुळे तिचे उरलेसुरले अवसान गळाले. ओठ नुसतेच थरथरत राहत. ओठांतून शब्द फुटेना. तरीही भावाला भेटण्याची तीव्र इच्छा अश्रूंतून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांवरून व्यक्त होत होती. तिची ती अवस्था पाहून ज्योतीसमधील सर्वांचे मन हेलावून गेले. तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, असे खोटे सांगितल्यानंतर बहिणीला शेवटचे पाहण्यासाठी का होईना, परंतु त्याने थेट कळंबोली गाठली. त्यावेळी भावाला पाहून तिला खूप काही बोलावंसं वाटत होतं... परंतु, बोलताच येत नसल्याने तिच्या भावना भावाला कळत नव्हत्या. भावाला भेटल्याच्या आनंदामुळे डोळ्यात अश्रूधारा वाहत होत्या. मनात भावना दाटून आल्या होत्या. भावनांना वाट करून देण्यासाठी शब्दच फुटत नव्हते.

भावनिक आधार महत्त्वाचा
एचआयव्हीची लागण झाली म्हणून कुटुंबीयांनी दूर लोटू नये. त्या रुग्णाला मानसिक आधार देण्याची गरज असते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी किमान विचारपूस करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रुग्णाला पुढचे आयुष्य सुखाने जगता येते, असे डॉ. दिव्या मित्तल यांनी सांगितले. या रोगाची लागण झाल्यामुळे रुग्णाचा तिरस्कार करू नका, त्याला आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.

औषधोपचार आणि पोटभर जेवण
औषधोपचार आणि पोटभर जेवण मिळाल्यानंतर असे एड्‌सचे रुग्ण सशक्त आयुष्य जगू शकतात. त्यामुळे आपला आजार लपवण्याऐवजी कुटुंबीयांना त्याची कल्पना देणे आवश्‍यक आहे, असे मत समुपदेशक धनश्री साळुंखे यांनी व्यक्त केले. योग्य वेळ आणि औषधे वापरल्याने एचआयव्ही बाधित रुग्णाला काही महिने किंवा वर्षे तरी वाढीव आयुष्य जगता येते, असेही त्या म्हणाल्या.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: Esakal

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya