एचआयव्हीबाधित रुग्णांना सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी बाधित रुग्णांचा आकडा आणि प्रत्यक्ष लाभ मिळालेले लाभार्थी यांच्यातील तफावतीची दरी अत्यंत खोल आहे, ही तफावत कशी भरून काढणार हा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यापुढील गंभीर प्रश्न आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी अखेर राज्यात आयसीटीसी केंद्रात आढळलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 68 हजार 588 इतकी आहे, तर आतापर्यंत विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून 7 हजार 325 रुग्णांना शासनाने मदत केली आहे.

एचआयव्ही हा असाध्य रोग होऊ नये, म्हणून शासकीय तसेच खासगी स्तरांवर प्रबोधनात्मक अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे एचआयव्ही बाधितांची टक्केवारी कमी होत आहे, तरीही राज्यात आज घडीस सहा लाखांच्या आसपास बाधित रुग्ण आहेत. या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा जास्तीत जास्त खर्च हा औषधोपचारावर होत असतो. अशावेळी एचआयव्ही बाधित रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून बाधित रुग्णांना मदत करण्याचे प्रयत्न शासन करीत असले तरीही रुग्णांचा आकडा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारे रुग्ण यांची तुलनात्मक टक्केवारी अत्यंत अल्प आहे.
या रुग्णांना संजय गांधी योजना, बाल संगोपन योजना, श्रावणबाळ योजना, पोषक आहार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांच्या माध्यमातून ही मदत दिली गेली आहे.
सामाजिक सुरक्षा योजना आणि बाधित लाभार्थींची आकडेवारी
संजय गांधी योजना : 3,251बाल संगोपन योजना : 324
श्रावणबाळ योजना : 23
केशरी रेशनकार्डधारक सवलत : 436
दारिद्य्र रेषेखालील कार्ड सवलत : 496
पोषक आहार योजना : 1,355
अंत्योदय योजना : 817
इतर योजना : 623
Source
सकाळ
१२ ऑगस्ट २०१३, मुंबई, भारत