Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

भेटीलागी जीवा अशीही लागते आस...

Print PDF
भेटीलागी जीवा अशीही लागते आस...
रुग्णालयात सोडून गेलेला तिचा भाऊ पुन्हा परतलाच नाही. तिने मात्र, सतत त्याला भेटण्याचा धोषा लावलेला. रडून-रडून तिचे अश्रू सुकले तरी तिचा भाऊ आलाच नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बहिणीचा मृत्यू झाल्याचे खोटेच सांगितले. ती खात्री करून घेण्यासाठी आलेला भाऊ तिला भेटला, पण या भेटीत बोलणे काहीच झाले नाही. कारण भावाला भेटण्याच्या ध्यासाने तिची वाचाच गेली आहे. भावना उफाळून आल्या होत्या, पण शब्द फुटत नव्हते... अशी मन हेलावून सोडणारी एका बहिणीची ही करुणार्त भेट.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली ही महिला आपल्या माहेरी राहत होती. वेळोवेळी येणाऱ्या आजारपणामुळे डॉक्‍टरांनी तिला एचआयव्हीची तपासणी करण्याचा सल्ला दिला. तपासणीत तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे तिच्या अंगातील त्राण संपले. मानसिक त्रास सुरू झाला. गावी मोठ्या भावाचे छत्र होते; परंतु या रोगामुळे एके रात्री त्या पित्यासमान भावाने तिला घराबाहेर काढले. नेमकं जायचं कुठे, हा यक्षप्रश्‍न तिच्या समोर "आ' वासून उभा होता. शेवटचा आसरा होता, तो मुंबईला राहणाऱ्या छोट्या भावाचा. तिने थेट मुंबई गाठली. भावाला एचआयव्हीसंदर्भात समजल्यावर त्यानेही तिचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली. लोकांच्या भीतीने तिला घरात ठेवताही येत नव्हते आणि घराबाहेर काढणेही जमेना. त्यादरम्यान, कळंबोलीतील ज्योतीस केअर सेंटरमध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांची काळजी घेतली जात असल्याचे एका मित्राकडून समजले. तेव्हा आपल्या एचआयव्ही बाधित बहिणीला घरातील मोलकरीण असल्याचे सांगून छोट्या भावाने "ज्योतीस केअर सेंटर'मध्ये जून 2009 मध्ये दाखल केले. सेंटरमधील सोपस्कार पूर्ण करून तिच्या भावाने तेथून काढता पाय घेतला. डॉ. दिव्या मित्तल यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू झाले. रोगामुळे भावांनी दूर लोटले... सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांकडून साधी विचारपूसही होत नाही, आपण एकटे पडलो आहोत, या विचारांमुळे तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले. समोरच्या भिंतीकडे व छताकडे एकटक शून्य नजरेने ती पाहत राही. डॉ. मित्तल यांच्यासह ज्योतीस सेंटरच्या सिस्टर्स, नर्स, समुपदेशक धनश्री साळुंखे आदींनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. त्यावेळी तिचे मानसिक संतुलन ढासळल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मेंदूवर परिणाम होत होता. मानसिक, भावनिक संवेदना कार्यक्षम असताना तिच्या मनाने भावाला भेटण्याचा ध्यास घेतला होता. तिने डॉक्‍टरांकडे त्यासाठी तगादा लावला. तिची भावाला भेटण्याची ओढ पाहून ज्योतीसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने दिलेला पत्ता अर्धवट असल्याचे आढळून आले. मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर तो काहीतरी सबबी सांगून भेटायला येण्यास टाळाटाळ करू लागला. कित्येक दिवस वाट पाहूनही भाऊ न भेटल्यामुळे तिचे उरलेसुरले अवसान गळाले. ओठ नुसतेच थरथरत राहत. ओठांतून शब्द फुटेना. तरीही भावाला भेटण्याची तीव्र इच्छा अश्रूंतून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांवरून व्यक्त होत होती. तिची ती अवस्था पाहून ज्योतीसमधील सर्वांचे मन हेलावून गेले. तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, असे खोटे सांगितल्यानंतर बहिणीला शेवटचे पाहण्यासाठी का होईना, परंतु त्याने थेट कळंबोली गाठली. त्यावेळी भावाला पाहून तिला खूप काही बोलावंसं वाटत होतं... परंतु, बोलताच येत नसल्याने तिच्या भावना भावाला कळत नव्हत्या. भावाला भेटल्याच्या आनंदामुळे डोळ्यात अश्रूधारा वाहत होत्या. मनात भावना दाटून आल्या होत्या. भावनांना वाट करून देण्यासाठी शब्दच फुटत नव्हते.

भावनिक आधार महत्त्वाचा
एचआयव्हीची लागण झाली म्हणून कुटुंबीयांनी दूर लोटू नये. त्या रुग्णाला मानसिक आधार देण्याची गरज असते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी किमान विचारपूस करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रुग्णाला पुढचे आयुष्य सुखाने जगता येते, असे डॉ. दिव्या मित्तल यांनी सांगितले. या रोगाची लागण झाल्यामुळे रुग्णाचा तिरस्कार करू नका, त्याला आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.

औषधोपचार आणि पोटभर जेवण
औषधोपचार आणि पोटभर जेवण मिळाल्यानंतर असे एड्‌सचे रुग्ण सशक्त आयुष्य जगू शकतात. त्यामुळे आपला आजार लपवण्याऐवजी कुटुंबीयांना त्याची कल्पना देणे आवश्‍यक आहे, असे मत समुपदेशक धनश्री साळुंखे यांनी व्यक्त केले. योग्य वेळ आणि औषधे वापरल्याने एचआयव्ही बाधित रुग्णाला काही महिने किंवा वर्षे तरी वाढीव आयुष्य जगता येते, असेही त्या म्हणाल्या.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: Esakal

ओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता

Print PDF
ओरल सेक्समध्ये एचआयवी आणि एड्सची भीती भलेही नसेल, पण घशाच्या कॅन्सरची शक्यता मात्र असल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे. एका अहवालानुसार, घशाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्याला ओरल सेक्सचे वाढते प्रमाणही काही अंशी जबाबदार आहे.

या अहवालानुसार, तंबाखू आणि दारू पिणे या कारणांपेक्षाही ओरल सेक्सदरम्यान संक्रमित होणारा ह्यूमन पॅपिलोमावायरस (एचपीवी) घशाच्या कॅन्सरसाठी अधिक कारणीभूत ठरतो.

प्रत्येक वर्षा या कॅन्सरचे सुमारे सहा हजार रूग्ण सापडतात. त्यात ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुरूषांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, येत्या दहा वर्षात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणा-या रुग्णांची संख्या सर्वात अधिक असेल.

तज्ज्ञांच्या मते, १९६० ते ७० च्या दरम्यान लोकांच्या सेक्स बिहेवियरमध्ये लक्षणीय बदल झाला. हा त्याचाच परिणाम आहे. आम्ही आमच्या क्लिकनिकमध्ये घशाचा कॅन्सर झालेले जे रोगी पाहिले आहेत त्यात एचवीपीमुळे घशाचा कॅन्सर होणारे रोगी अधिक असल्याचे युनिवर्सिटी ऑफ शिकागो मेडिकल सेंटरचे ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. एजरा कॉहेन यांनी सांगितले.
Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: महाराष्ट्र टाईम्स

एड्सचा उगम

Print PDF
एड्स हा रोग प्रथम कधी उद्भवला. त्याचा शोध कधी लागला?
१९८१ साली अमेरिकेत लॉस अॅन्जेलिस या ठिकाणी प्रथम एड्सचे रोगी निदर्शनास आले. त्या वेळी या नवीन रोगाचं कारण कळू शकलं नाही. एड्स हे नावही त्या वेळी ठेवलं गेलं नव्हतं. पण हा रोग समलिंगी लैंगिक संबंध (Homosexuals) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये दिसून येतो, याची मात्र नोंद घेतली गेली. याचवषीर् युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील काही ठिकाणी इण्ट्राबिनस ड्रग्जचं व्यसन करणाऱ्या लोकांमध्येही हा रोग दिसून आला. सुरुवातीला केवळ व्यसनाधीन आणि समलिंगी संबंध करणाऱ्या लोकांमध्येच हा रोग होऊ शकतो, असा गैरसमज अनेकांनी करून घेतला. पण पुढे हे स्पष्ट होत गेलं की विभिन्नलिंगी संबंध (Heterosexual) केल्याने ही हा रोग होऊ शकतो.

१९८३ साली पॅरिसमधल्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये या रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना शोधण्यात यश आलं. व्हायरस जातीच्या या जीवाणूंना पुढे Human immuno deficiency virus, ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सि व्हायरस म्हणजे एचआयव्ही हे नाव देण्यात आलं. या जीवाणूंमुळे रक्तातील टी हेल्पर सेल किंवा टी४ सेल या पेशी नष्ट होतात. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करता येण्याची जी क्षमता (Immunity) आपल्या शरीरात असते तिच्याशी या पेशींचा थेट संबंध असतो. जीवाणूंमुळे या पेशी नष्ट होऊ लागताच व्यक्तीवर मग कुठलेही जंतू आक्रमण करून रोग निर्माण करू शकतात.

त्वचेपासून मेंदूपर्यंत, फुफ्फुसांपासून आतड्यापर्यंत सर्वच अवयव विविध रोगांनी ग्रासले जाऊन व्यक्ती असह्य यातना आणि हालअपेष्ठा सोसत मृत्यूमुखी पडते. असा अंत व्हायला मात्र जीवाणू शरीरात प्रविष्ट झाल्यापासून पाच ते दहा वर्षांचा काळ लागतो.

एड्सचे जीवाणू शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर सुरुवातीची ५ ते १० वर्षं व्यक्ती बाहेरून निरोगी आणि सर्वसामान्य दिसते. व्यक्तीला स्वत:लाही आपल्याला बाधा झाली आहे, याचा मागमूस लागत नाही. हा काळ सर्वाधिक धोकादायक म्हणावा लागेल, कारण बाह्यांगी निरोगी दिसणाऱ्या या व्यक्तीकडून मात्र या काळात इतरांना या रोगाची लागण होऊ शकते.
Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: महाराष्ट्र टाईम्स

एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे राज्यस्तरीय संमेलन सुरू.

Print PDF
एच.आय.व्ही चा संसर्ग झालेल्या युवकांच्या राज्यस्तरीय संमेलनास पुण्यात मंगळवारपासून सुरवात झाली. भांडारकर रस्त्यावरील रणजीत हॉटेल येथे ९ जून ते ११ जून २००९ पर्यन्त हे संमेलन चालणार आहे. पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया व नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही (एनएमपी प्लस) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन भरले आहे. महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ऍड. निलेश निकम यांच्या हस्ते ह्या संमेलनाचे उद्घाटन झाले. या वेळी एन.एम.पी.चे मनोज परदेशी, पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या रोहिणी गोरे, डॉ. गंगा खेडकर उपस्थित होते. संमेलनात राज्याच्या ३४ जिल्ह्यांमधून आलेले युवक तसेच स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत. एच.आय.व्ही.बाबत माहिती देणा-या भित्तीपत्रकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही ह्या वेळी करण्यात आले.

निलेश निकम म्हणाले, "एच.आय.व्ही. रोखण्यासाठी तुम्ही युवकांनी एकत्र येत जे व्रत घेतले आहे, ते खूप मोठे आहे. एच.आय.व्ही.चा प्रसार होऊ नये या साठी सरकारतर्फेही अनेक उपक्रम राबवले जातात, परंतु स्वयंसेवी संस्थांचे कार्य खरोखर मोलाचे आहे." मनोज परदेशी म्हणाले, "एन.एम.पी.प्लसच्या माध्यमातून आज राज्यभरातील ३५,००० एच.आय.व्ही.ग्रस्त नागरिक जोडले आहेत." वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रीयांचा निरोध बाबतचा आग्रह आणि एच.आय.व्ही.ग्रस्तांचे स्व-मदत गट यांचे एच.आय.व्ही. नियत्रित करण्यात मोठे योगदान असल्याचे मत गंगा खेडकर यांनी व्यक्त केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

रुग्णांनाही ‘लग्नाच्या बेडी’त अडकविणारे संकेतस्थळ !

Print PDF
एखादा तरुण अथवा तरुणी कोणत्या तरी दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे कळाले, तरी तिच्यापासून थोड दूरच राहणे समाज पसंत करतो. मात्र तिच्याशी वा त्याच्याशी सात फे ऱ्या घेऊन ‘लग्नाच्या बेडी’त अडकणारे मात्र क्वचितच! अशाच एचआयव्ही, एड्सग्रस्त, कर्करुग्ण, अपंगत्व, फिट्सकिंवा झटके येणाऱ्या रुग्णांना मात्र लग्नाच्या बेडीत अडकविणारे www.vivah.aarogya.com हे संकेतस्थळ विकसित झाले असून अद्यापपर्यंत सहा रुग्णांचे मनोमिलन झाल्याने ती जोडपी ‘मेड फॉर इच आदर’ ठरली आहेत. एखाद्या व्यक्तीला वा तरुण महिलेला एचआयव्ही, एड्स, कर्करोग, अंपगत्वासारखे आजार झाल्यास त्याला किंवा तिला आयुष्याचा जोडीदार मिळणे दुरापास्तच असते. विशेषत: महिला रुग्णांना अशा प्रकारचा वा चांगला जोडीदार मिळणे अशक्यच! आई- वडिलांच्या जीवावर त्या रूपाने मोठे ओझेच असते अशी समाजाची मानसिकता आहे. मात्र या समजाला फाटा देण्याचे काम या संकेतस्थळाद्वारे करण्यात येत आहे. या संकेतस्थळाद्वारे विविध रुग्णांना बहुतांश त्यांच्यासारखेच रुग्ण ‘जोडीदार’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ‘मेड फॉर इच आदर’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे.

टी. एच. सोल्युशन कंपनीचे (ऑपरेशन) संचालक आनंद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’कडे संकेतस्थळाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. www.vivah.aarogya.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विवाहस्थळ शोधण्यासाठी नवे व्यासपीठ खुले करून देण्यात आले आहे. विशेषत: लग्नापूर्वी कोणता वर अथवा वधू ही बाधित वा रुग्ण असल्याचे एकमेकांना समजले की लग्न मोडले जाते. मात्र मनाचा मोठेपणा दाखवून बाधित त्याच्याशी वा तिच्याशी लग्न करणारे दुर्मिळच! त्यामुळे कोणत्या तरी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांचे वैवाहिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण समाजाच्या या मानसिकतेमुळे हा अधिकार आपोआपच हिरावून घेतला जातो. म्हणून ज्यांचा मुलगा वा मुलगी ही एचआयव्ही, एड्सग्रस्त किंवा कर्करुग्ण, फिट्स (मारगी) अपंग असेल अशा रुग्णांना त्यांच्यासारखेच कोठेतरी असणारे रुग्ण ‘जोडीदार’ म्हणून मिळवून देण्याची संधी या संकेतस्थळाद्वारे प्रश्नप्त झाली आहे. यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त असून आतापर्यंत फिट्स येणाऱ्या सहा जोडप्यांची लग्ने यशस्वीपणे लावून देण्यात आली आहे. त्यानंतर जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांमध्ये एचआयव्हीग्रस्तांची संख्याही लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ कर्करुग्ण, अपंग अशा रुग्णांचा क्रमांक लागतो. या संकेतस्थळावर विवाह नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ऑनलाइनद्वारे अर्ज भरता येतो. तशी आपली निवडही ठरविता येते,’’ अशी माहिती आनंद शिंदे यांनी दिली.
Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: लोकसत्ता

Page 10 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya