Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

एचआयव्ही बाधित 386 रुग्णांचा पाच वर्षांत मृत्यू

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
३० नोव्हेंबर २०१०
धुळे, भारत

शहरासह जिल्ह्यातील अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2006 ते 2010 या पाच वर्षात सात हजार 740 रुग्णांची जिल्हा रुग्णालय, ए. आर. टी. सेंटरमध्ये नोंद झाली. त्यापैकी 3 हजार 482 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जनजागृतीच्या उद्देशाने विविध कार्यक्रम जागतिक एड्‌स विरोधी जनजागृतीदिनानिमित्त एक डिसेंबरपासून आठवडाभर होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुळकर्णी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अप्पर जिल्हाधिकारी एस.एस. गुंजाळ, अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, डॉ. संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जे. एम. बोरसे, डॉ. एम. एम. अन्सारी, राजेश भोसले, डॉ. खान आदी उपस्थित होते. डॉ. कुळकर्णी, शिंदे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात दहा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र आहेत. तेथे गर्भवतींना स्वेच्छेने समुपदेशन केले जाते. जनजागृतीमुळे असंख्य बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाविद्यालयीन तरुण- तरुणी, ग्रामीण भागातील जनताही या आजाराविषयी माहिती जाणून घेत आहे. काही वर्षात चाचणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. महाविद्यालय, ट्रकचालक, महिला यांचेही मेळावे घेतले जात असल्याने शासकीय, निमशासकीय संस्थांचा त्यातील सहभाग वाढता आहे.

जनजागृतीपर कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे येथील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे एक डिसेंबरपासून जनजागृतीपर कार्यक्रम होतील. जिल्हा रुग्णालयातून सकाळी साडेआठला परिचारिकांसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक आयसीटीसी केंद्रातर्फे युवक- युवती मेळावा होईल. ट्रकचालक, स्थलांतरित कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी जनजागृतीपर मेळावा होईल.

Read more...

भेदभावामुळे कोमेजतेय 'एचआयव्ही' मुलांचे बालपण

Print PDF
महाराष्ट्र टाइम्स
१२ मार्च २०१०

एचआयव्ही संसगिर्त मुलांच्या बाबतीत भेदभावाची सुरुवात त्यांच्या कुटुंबापासूनच होते. त्यानंतर शाळा, समाज आणि आरोग्य यंत्रणा या स्तरावर त्यांची हेळसांड सुरू होते. या वागणुकीचा मुलांच्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम होतो. त्यामध्ये त्यांचे बालपण कोमेजून जाते. या कोवळ्या जीवांना साधं जगण्यासाठी एवढे धडपडावे लागते ही समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा डॉ. शांता सिन्हा यांनी व्यक्त केले.

'सेण्टर फॉर अॅडव्होकसी अॅण्ड रिसर्च' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. एचआयव्हीग्रस्त मुख्यत: मुलांना मिळणाऱ्या भेदभावाच्या समस्येवर उहापोह करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांतील सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी परिषदेमध्ये सहभागी झाले होते. गेल्या वषीर् लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे एचआयव्हीग्रस्त मुलाबरोबर आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाझ, हक्क आणि प्रयास संस्थांच्या संयुक्त सत्यशोधन समितीने भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

एचआयव्ही आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो हे वास्तव खुलेपणाने स्वीकारण्याचे वातावरण समाजात निर्माण झाले पाहिजे. याबरोबर संसगिर्त व्यक्तींना आपल्या आजाराशी सामना करण्याचे तसेच आपला आजार न लपवता पुढे येण्याचे धैर्य दिले पाहिजे. तरच त्यांचे सक्षमीकरण होईल, असेही मत डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केले.

भेदभावाच्या समस्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्था, आरोग्य आणि शिक्षण संस्था, बाल हक्क समित्या, ग्रामस्थ यांचा फोरम तयार करण्याचा निर्णय परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी घेतला.

Read more...

'कुंपणावर'च्या माणसांना मिळाली जगण्याची उमेद

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
उत्तमकुमार इंदोरे
पुणे, भारत

""आधी कुठलंही समुपदेशन न करता तुम्ही "एचआयव्ही'बाधित आहात, असं डॉक्‍टरांनी थेट सांगितलं अन्‌ आभाळ कोसळल्याचा भास झाला... घरच्यांनी धसका घेतला, वडिलांनी तर बहिष्कृतच केलं... आयुष्यभराची साथ करण्याची शपथ घेतलेल्या पत्नीनेही मग समाजाच्या बोचऱ्या नजरांना कंटाळून स्वत:ची कायमची सुटका करून घेतली अन्‌ मी पोरका झालो... पण स्वत:ला सावरत, लढत माझ्यासारख्याच समदु:खी असलेल्या मैत्रिणीशी विवाह झाला अन्‌ पुन्हा जगण्याची उमेद मिळाली...!''

"एचआयव्ही'बाधित आदित्य (नाव बदलले आहे) आपल्या भावनांना वाट करून देत होते. त्याच आजाराने बाधित असलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही अशाच वेदना व्यक्त केल्या. "एचआयव्ही'बाधित असलेल्या व पहिल्या जोडीदाराची साथ सुटलेल्या अशा एक नव्हे, तब्बल बारा जणांनी "एचआयव्ही'बाधित जोडीदार निवडून जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे. समाजाच्या आणि जगण्या-मरण्याच्याही "कुंपणावर' असलेल्या या माणसांशी जागतिक एड्‌स दिनानिमित्त संवाद साधला, तेव्हा स्वत:च्या लढाईबरोबरच त्यांनी आणखी एका जीवनाची लढाई जिंकल्याचे जाणवले.

विवाहबद्ध झालेल्या या बाराही व्यक्ती पुणे जिल्हा, मुंबई आणि परिसरातील आहेत. मानव्य, अक्षदा, रोटरी क्‍लब आणि नेटवर्क ऑफ पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही या संस्थांनी त्यांना ही नवी उमेद दिली. या बारा जणांचे रूपांतर सहा दांपत्यांत करताना या संस्थांनी त्यांना स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्यामुळेच, तोपर्यंत स्वत:च्या आजाराकडे न्यूनगंडाने पाहणारी ही मंडळी त्यांच्या सामूहिक लग्नसमारंभात मोकळेपणाने बोलली. त्यांच्या विवाहाला आता चार महिने होतील, पण एकमेकांच्या आधाराने ही मंडळी इतर सर्वसामान्यांसारखा संसार करताहेत, हे त्यांच्याशी बोलल्यावर दिसले. अर्थात औषधोपचार आणि एकमेकांचा आधार सोबतीला आहेच.

या सर्वांत ग्रामीण भागातील आदित्य (नाव बदललेले) यांचा अनुभव मात्र बोलका होता. "1999 मध्ये मधुमेह असल्याचं प्रथम निदान झालं, पण त्यावरील गोळ्या खाऊ लागल्यावर त्रास वाढला, म्हणून रक्ततपासणी केली.

Read more...

आंध्रपाठोपाठ महाराष्ट्रात एड्‌सग्रस्तांची वाढती संख्या

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
मुंबई, भारत

संपूर्ण जगाला "एड्‌स'चा विळखा करकचून आवळत असून भारतात आंध्र प्रदेशात एड्‌सचे सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे. आंध्रमध्ये "एचआयव्ही'ग्रस्तांची संख्या 1.07 टक्के इतकी असून महाराष्ट्रात हेच प्रमाण 0.64 टक्के इतके आहे. जागतिक एड्‌स प्रतिबंधक दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत "पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'ने ही माहिती दिली.

भारत येत्या काळातील जागतिक महासत्ता आणि फार्मा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दादा देश म्हणून पुढे येणार आहे. मात्र, "एचआयव्ही'चा धोका ओळखून पालकांपासून मुलांना लागण होणाऱ्या या रोगावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना देशात होऊ शकलेली नाही, अशी खंत "पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'चे डॉ. आय. एस. गिल्डा यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेने केलेल्या पाहणीत भारतात 2009 मध्ये 65 हजार "एचआयव्ही'बाधित मातांकडून 18 हजार नवजात अर्भकांना या रोगाची लागण लागल्याची माहिती या वेळी देण्यात आली. फक्त दहा टक्के गर्भवती महिला "एचआयव्ही' प्रतिबंधात्मक औषधांचा डोस घेत असल्याचे डॉ. गिल्डा यांनी स्पष्ट केले. तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये "एड्‌स'बाबत धोक्‍याच्या सीमारेषेवर असून पंजाब, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यात एड्‌स वाढत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Read more...

"बेल एअर' ठरतेय एड्‌सग्रस्तांसाठी संजीवनी

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
रविकांत बेलोशे
भिलार, भारत

एड्‌सग्रस्तांची काळजी घेत त्यांच्यावर उपचार करीत मानसिक आधार देणारे वैद्यकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील बेल एअर हॉस्पिटल एड्‌सग्रस्तांसह एचआयव्ही बाधितांसाठीही संजीवनी ठरत आहे. सन 2008- 09 मध्ये या रुग्णालयात 2015 जणांवर उपचार झाले आहेत. उपचारांबाबत जागरूकता वाढल्याने यंदा 2140 रुग्णांवर तेथे उपचार करण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, एड्‌स जनजागृतीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब ठरू लागली आहे.

एड्‌ससारखा दुर्धर रोग जडल्यावर "समाज काय म्हणेल?' या भीतीने खंगत खंगत जीवन जगण्यापेक्षा "बेल एअर'मधील वैद्यकीय केंद्रावर येऊन उपचार घेत आयुष्य सकारात्मतेने जगण्याचे बळ मिळत असल्याची संबंधितांची प्रतिक्रिया आहे. उपचारांकडे वाढता कल हे अवहेलना थांबवण्यासाठीची वाढती जागरूकताच समजावी लागेल.

याबाबत रुग्णालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन 2000- 01 मध्ये "बेल एअर'च्या एड्‌सबाधितांवरील उपचार केंद्रात 260 रुग्ण भरती झाले होते. उपचाराबाबत जागृती वाढल्यानेच आज 2010 मध्ये या केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या 2140 पर्यंत गेली आहे.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ आदी परराज्यातूनही याठिकाणी उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालित बेल एअर हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीग्रस्तांना जगण्यासाठीची मानसिक उभारी दिली जाते. केवळ सहानुभूती न ठेवता या रोगाशी सामूहिक मुकाबला कसा करायचा व आपले उरलेले आयुष्य कसे चांगल्या पद्धतीने जगायचे याचे मार्गदर्शन तेथे केले जाते.

एड्‌सच्या बाधेमुळे जगण्याची उमेदच गमावून बसलेल्यांना आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या बेल एअर हॉस्पिटलने सामाजिक आधार व सुरक्षिततेचा संदेश देताना त्यांच्यावर उपचारही करून जगण्याचे बळच दिले आहे.

Read more...

Page 4 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya