Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

संपत्तीच्या लालसेने आईला दिले 'एचआयव्ही'चे इंजेक्‍शन

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०५ ऑक्टोबर २०१०
हैदराबाद, भारत

संपत्तीच्या हव्यासापोटी मुलींनी जन्मदात्या आईला 'एचआयव्ही'बाधित रक्ताचे इंजेक्‍शन देण्याचा खळबळजनक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. या कृत्यानंतर दोन्ही संशयित मुली फरारी असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गुंटूर जिल्ह्यातील ब्रोडीपेठ भागात राहणारे राचकोंडा भारती (वय 65) आणि राचकोंडा रंगाराव (70) या दांपत्याला दोन मुली आहेत. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी अशी त्यांची नावे असून, काही वर्षांपूर्वीच त्यांचे विवाह झाले आहेत. दुर्गादेवी गृहिणी; तर कामेश्‍वरी एका सरकारी रुग्णालयात परिचारिका आहे. जमीनदार असलेल्या राचकोंडा दांपत्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता असून, काही तोळे सोने आणि रोख रक्कम आहे. ही संपत्ती मिळविण्यासाठी दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांचा काही महिन्यांपासून छळ सुरू केला होता.

मालमत्ता दोघींच्या नावावर करण्याचा तगादा दुर्गादेवी आणि कामेश्‍वरीने लावला होता. अनेकदा त्यांच्यात भांडणेही झाली होती. सोने आणि पैशांमध्ये वाटा देण्याचीही दोन्ही मुलींची मागणी होती. "आमच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती तुम्हालाच मिळणार आहे, तोपर्यंत तरी थांबा' असे राचकोंडा दांपत्य त्यांना वारंवार सांगत होते. तीन महिन्यांपूर्वी भारती यांना ताप भरला होता. उपचार करण्याच्या निमित्ताने कामेश्‍वरी आणि दुर्गादेवी यांनी "एचआयव्ही'बाधित रक्ताचे "इंजेक्‍शन' त्यांना दिले. "इंजेक्‍शन' लाल रंगाचे असल्याने भारती यांना संशयही आला होता. मात्र, अशक्तपणा कमी होण्यासाठी त्यात औषध सोडल्याचे त्यांना सांगण्यात आले.

तीन महिन्यांत भारती यांना अधिकच अशक्‍त वाटू लागल्याने गेल्या आठवड्यात त्यांच्या "एचआयव्ही' चाचण्या करण्यात आल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. हा प्रकार समजल्यानंतर रंगाराव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी या दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. कामश्‍वेरीचे कृत्य समजल्यानंतर तिचे पती दुर्गाराव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read more...

एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०१ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत

राज्यातील "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांमध्ये पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. पहिला क्रमांक मुंबईचा असून, तेथेच या रोगाच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्याचा मृतांमध्ये दुसरा क्रमांक आहे.

राज्यात 1986 पासून सप्टेंबर 2009 पर्यंत 87 हजार 773 "एचआयव्ही'चे रुग्ण असल्याची नोंद आरोग्य खात्यात आहे. त्यात एकट्या मुंबईमध्ये 41 हजार 213 रुग्ण, तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 15 हजार 414 रुग्ण आढळले आहेत. काही वर्षांपासून "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांच्या संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत 57 हजार 920 पुरुष आणि 29 हजार 853 स्त्रिया आहेत.

राज्यात "एचआयव्ही'मुळे पाच हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार हजार 158 पुरुष असून, एक हजार 692 स्त्रिया आहेत, अशी माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. सांगलीमध्ये आतापर्यंत चार हजार 203 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याची नोंद आहे. राज्यात "एचआयव्ही'मध्ये या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यातील 826 रुग्णांचा "एचआयव्ही'ने मृत्यू झाला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Read more...

वेश्‍यावस्तीत उभारली शाळा (व्हिडिओ)

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२६ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

वेश्‍यावस्तीत उभारली शाळा (व्हिडिओ)
व्हिडिओसाठी इथे क्लिक करा
देवदासींची मुले तसेच "एचआयव्ही'ग्रस्त मुलांसाठी एका तृतीयपंथीयाने वेश्‍यावस्तीत शाळा उभारली आहे. तिचे नाव आहे पन्ना... पन्ना व तिचे सहकारी लहान मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करतात. कुठलीही प्रसिद्धी व चर्चेपासून दूर असणारी पन्ना मुलांना शिक्षणाचे धडे देण्यात व त्यांच्यात रमण्यातच आनंद मिळत असल्याचे सांगते. समाजसेवा करणाऱ्या पन्नाचे बिल गेट्‌सनेही प्रशंसा केली होती...

Read more...

एड्‌सग्रस्तांना आता युवकांचा आधार

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

एचआयव्हीबाधित आणि एड्‌सग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी, या रुग्णांविषयी समाजात चांगली भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक- युवतींना येत्या गुरुवारी (ता. 12) एड्‌सग्रस्तांचे संरक्षण करणारी शपथ दिली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी एड्‌सविषयी जनजागृती फेरी काढली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र नगरे आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. शेंडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

ही फेरी गुरुवारी सकाळी नऊ वाजता शनिवारवाड्यापासून निघेल. त्यानंतर ती फडके हौद, रास्ता पेठ, के. ई. एम. रुग्णालय, लाल देऊळ, या मार्गाने जाणार असून तिचा समारोप बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे. जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि एन. सी. सी. चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. महापौर मोहनसिंग राजपाल आणि जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ केला जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 12 ते 19 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी युवक मेळावे घेतले जाणार आहेत. यंदाच्या युवा दिनाचे घोषवाक्‍य हे "सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' असे आहे.

Read more...

एचआयव्हीग्रस्तांची मुले "एचआयव्ही'मुक्त

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
सातारा, भारत

एचआयव्हीग्रस्त माता-पित्याकडून अर्भकास होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी पीपीटीसीटी हा कार्यक्रम संजीवनी ठरत आहे. या उपक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील 134 नवजातांचा "एचआयव्ही'मुक्त जन्म झाला आहे.

संपूर्ण देशाप्रमाणे साताऱ्यातही एचआयव्ही बाधितांची संख्या धोक्‍याच्या पातळीवर आहे. या आजाराची बाधा झालेल्या व्यक्तीला संपूर्ण बरे करण्याचे औषध अद्याप शोधण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. अद्यापही प्रतिबंधात्मक उपायांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे या रुग्णांच्या होऊ घातलेल्या मुलांवरही शंभर टक्के मृत्यूचे सावट निर्माण झाले होते. एखाद्याचा संपूर्ण वंश संपुष्टात येण्याची भीती होती; परंतु "पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे "नेविरॅपिन' औषध अशा मुलांसाठी जीवनदायी ठरत आहे. या औषधाच्या मोफत उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. जुलै 2003 पासून या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय व कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात या केंद्राची सुरवात झाली.

जिल्हा रुग्णालयातील केंद्रामध्ये 2007 पासून जुलै 2010 पर्यंत 89 हजार 105 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. त्यात 712 महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे आढळले. त्यापैकी 274 महिलांची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. या महिलांपैकी 244 महिलांनी त्यांना व त्यांच्या मुलाला "नेविरॅपिन' औषध देण्यास संमती दिली होती. त्यानुसार "पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत समुपदेशन व नेविरॅपिन औषध देऊन होणाऱ्या अर्भकास एचआयव्हीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 18 महिन्यांनंतर त्यातील 151 बालकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ 17 बालकांनाच एचआयव्हीची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 134 बालकांना एचआयव्हीमुक्त जीवन देण्यात जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व समुपदेशकांना यश आले आहे.

Read more...

Page 6 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya