एड्स च्या जनजागृतीसाठी झटणारी चिमुकली
मुंबईच्या प्राप्ती गिलाडे या ११ वर्षीय मुलीने अंतरराष्ट्रीय AIDS परिषदेमधे डरबन येथे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मुलीचे वडील AIDS चे सक्रिय कार्यकर्ते आहेत. फक्तAIDS परिषदेकरीता मर्यादित न राहता तिचे दूरदर्शन व आकाशवाणीवर अगणित कार्यक्रम झालेले आहेत.
प्राप्ती म्हणते,"माझे वडील डॉक्टर आहेत आणि ते AIDS चे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्याच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी या कार्यासाठी वाहून घ्यायचे ठरवले."
प्राप्ती आणि तिची बहीण दोघीही मिळून पथनाट्याद्वारे जनजागृती करत असत. प्राप्ती वयाने लहान असूनही बरेच लोक तिच्यामुळे प्रभावित होत असत. काही काही वेळा नुसते बघून निघून जात असत तर काहीवेळा नीट लक्ष देऊन ऐकतही असत.
ती म्हणते की तिचा अनेक AIDS ग्रस्त व्यक्तीशी संपर्क आला. तसेच त्यांचे हळूहळू मरणाकडे झूकणे पाहून तिला अत्यंत दुःख होत असे.
खूप तरुण मुले या भयानक आजाराला बळी पडतात अशांची तिला खूप दया येते. तिला याचे खूप दुःख वाटते. तिला असे वाटते की पालकांनी मुलांबरोबर AIDS बद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.
कंडोम वाटताना तुला लाज वाटते का असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "नाही यात मला काहीही अवघड किंवा चुकीचे वाटत नाही. कंडोम हे एकाअर्थी जीवनाचे रक्षकच आहे आणि जीवनाचे रक्षण करणार्या वस्तुचे वाटप करण्यात लाज कसली?" ती म्हणते भविष्यात तिला डॉक्टर व्हायचे आहे. या बद्दल ती म्हणते, "माझे वडील अशा बर्याच लोकांसह काम करतात. मलाही त्यांना मदत करावीशी वाटते. मला अशा AIDS ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करायला व त्यांच्या समस्यांवर मात करण्यास त्यांची मदत करायला आवडेल."
खरोखरच प्राप्ती एक AIDS च्या जनजागृतीसाठी काम करणा-या तरुणांपैकी एक आहे. तिने जगापुढे एक आदर्श घालून दिलेला आहे.