
पार्श्वभुमी
मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे माझी आयुष्यातील अनेक स्वप्ने होती. माझा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन हा खूप सकारात्मक आहे आणि सरळ मार्गी जगणे हा आहे. हे अनुभव शेअर करताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही.
माझा भूतकाळ
मी माझ्या कुटुंबियासोबत एक सर्वसामान्य आयुष्य जगत होतो. माझी दोन मुले आणि माझी पत्नी. मी एम.एस.ई.बी मध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करतो आहे. तसेच मी कामागारांना त्यांचे हक्क मिळवुन देण्याकरता युनियन साठी काम करतो.
नंतर १९९९ मध्ये मला स्किन इन्फेक्शन (एस.टी.आय.) झाले. तेंव्हा मी औरंगाबाद येथील डॉ.आल्हाद जाधव यांना दाखवले आणि त्यांनी दिलेल्या औषधांनी मला बरे वाटले पण परत काही काळाने तेच इन्फेक्शन झाले तेंव्हा डॉक्टरांनी मला एच.आय.व्ही. साठीची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. माझी टेस्ट पॉझीटीव्ह आली आणि तो मला एक खूप मोठा धक्का होता. माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले माझे कुटुंब आणि माझी नोकरी याचे कसे होईल ही चिंता मनाशी होती.
जेव्हा समजले तेंव्हा या बाबत मी माझ्या भावाशी बोललो. तेंव्हा त्याने मला खूप आधार दिला. तो म्हणाला की तू काही काळजी करु नकोस आपण चांगल्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊ. त्यानंतर माझ्या बायकोची टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मी नियमितपणे आय.सी.टी.सी. नियमित जाऊ लागलो.
माझा प्रवास
२००० मध्ये मला डॉ.जाधवांकडून एच.आय.व्ही. विषयीच्या कार्यकमांबद्दल माहीती मिळाली. तसेच औरंगाबाद मध्ये कॉनफरन्स होती त्याबद्दलही कळाले. त्या कॉनफरन्समध्ये माझी एन.एम.पी चे सदस्य राजेश शिर्के यांच्याशी ओळख झाली त्यांच्याकडून मला खूप आधार मिळाला. त्यांनी मला सांगितले की ते देखिल पॉझिटीव्ह आहेत. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून मराठवाडा झोन साठी एन.एम.पी. ची स्थापना करायचे ठरवले. आणि सध्या मी एन.एम.पी साठी काम करतो आहे.
२००९ करता माझे उद्दिष्ट
माझे २००९ चे उद्दिष्ट हे मुख्यत: नेतृत्वाशी संबंधित आहे. चांगल्या नेतृत्वगुणांनी आमच्या संस्थेची प्रगती कशी होईल, एच.आय.व्ही. सहित जगणार्या व्यक्तींची जीवनशैली कशी सुधारेल, आणि ही माणसे मानाने कशी जगू शकतील ह्यावरच मी आता लक्ष केंद्रित करणार आहे. एच.आय.व्ही सहीत जगणार्या व्यक्तींची क्षमता ओळखणे, त्यांना त्या त्या क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांना नोकरी मिळवून देण्यात मदत करणे, हे आता समाजाचे कर्तव्य बनले आहे. आमच्या कामाची दखल समाजात घेतली जाईल असा मला विश्वास वाततो.