"बेल एअर' ठरतेय एड्‌सग्रस्तांसाठी संजीवनी

Print
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
रविकांत बेलोशे
भिलार, भारत

एड्‌सग्रस्तांची काळजी घेत त्यांच्यावर उपचार करीत मानसिक आधार देणारे वैद्यकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील बेल एअर हॉस्पिटल एड्‌सग्रस्तांसह एचआयव्ही बाधितांसाठीही संजीवनी ठरत आहे. सन 2008- 09 मध्ये या रुग्णालयात 2015 जणांवर उपचार झाले आहेत. उपचारांबाबत जागरूकता वाढल्याने यंदा 2140 रुग्णांवर तेथे उपचार करण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, एड्‌स जनजागृतीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब ठरू लागली आहे.

एड्‌ससारखा दुर्धर रोग जडल्यावर "समाज काय म्हणेल?' या भीतीने खंगत खंगत जीवन जगण्यापेक्षा "बेल एअर'मधील वैद्यकीय केंद्रावर येऊन उपचार घेत आयुष्य सकारात्मतेने जगण्याचे बळ मिळत असल्याची संबंधितांची प्रतिक्रिया आहे. उपचारांकडे वाढता कल हे अवहेलना थांबवण्यासाठीची वाढती जागरूकताच समजावी लागेल.

याबाबत रुग्णालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन 2000- 01 मध्ये "बेल एअर'च्या एड्‌सबाधितांवरील उपचार केंद्रात 260 रुग्ण भरती झाले होते. उपचाराबाबत जागृती वाढल्यानेच आज 2010 मध्ये या केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या 2140 पर्यंत गेली आहे.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ आदी परराज्यातूनही याठिकाणी उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालित बेल एअर हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीग्रस्तांना जगण्यासाठीची मानसिक उभारी दिली जाते. केवळ सहानुभूती न ठेवता या रोगाशी सामूहिक मुकाबला कसा करायचा व आपले उरलेले आयुष्य कसे चांगल्या पद्धतीने जगायचे याचे मार्गदर्शन तेथे केले जाते.

एड्‌सच्या बाधेमुळे जगण्याची उमेदच गमावून बसलेल्यांना आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या बेल एअर हॉस्पिटलने सामाजिक आधार व सुरक्षिततेचा संदेश देताना त्यांच्यावर उपचारही करून जगण्याचे बळच दिले आहे.

सन 2007 ला जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगात सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त लोकांना एड्‌सची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाच्या संसर्गतेचे प्रमाण 15 ते 40 वयोगटातील स्त्री व पुरुषांमध्ये वाढत असल्याचे विदारक चित्र आहे. एड्‌स रोखण्यासाठी शासकीय अनुदानांची खैरात होत असली, तरी काहींच्या बाहेरख्याली वागण्यामुळे एड्‌स रोखण्यात अपयश येत असल्याची विदारक वास्तवता पुढे येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दिवसेंदिवस जिल्ह्यातील एड्‌सबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे गंभीर चित्र आहे. जागतिक आकडेवारीचा विचार करता, 20 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या एड्‌स नियंत्रणासाठी प्राधान्याने राज्यात मोठ्या जनजागृतीची आवश्‍यकता आहे.

महाराष्ट्रात सध्या साडेचार लाख रुग्ण एड्‌सबाधित असल्याची माहिती पुढे आली असून, संबंधित रुग्णांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या दुप्पट आहे. नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) च्या माध्यमातून या रोगाच्या नियंत्रण, उपचार व मार्गदर्शनासाठी देशपातळीवर कार्य सुरू आहे. यावर मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. "नॅको'च्या नियंत्रणाखाली ऍव्हर्ट सोसायटी व महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्था (सॅक) या दोन संस्था कार्यरत आहेत.

""पूर्वी समाजाच्या अनामिक भीतीने एड्‌सबाधित रुग्ण पुढे येत नसत, त्यामुळे खरी माहिती पुढे येत नव्हती, मात्र आता अगदी शासकीय रुग्णालये, रक्त तपासणी पेढ्या, खासगी रुग्णालये यांतून लगेच याबाबत निदान होत असल्याने रुग्णाची संख्यात्मक सत्य माहिती आता पुढे येत आहे. हा नियंत्रणाच्या दृष्टीने फायद्याची बाब आहे. "बेल एअर'मध्ये रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यांच्यावर उपचार होऊन, त्यातून सुधारित जीवन जगण्याचे बळ मिळविणाऱ्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे.''

फादर टॉमी, "सॅक'चे चेअरमन
"बेल एअर'मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा संख्यात्मक आढावा
Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.