कर्मयोगी विद्याविकास व सामाजीक बहुउद्देशिय संस्था

Print
लिटिल एन्जल्स राइड
कर्मयोगी विद्याविकास व सामाजिक बहु-उद्देशिय संस्था एडसचा फैलाव रोखणे, त्यावरील उपचारासाठी आवश्यक ती मदत करणे व एडस् संसर्गितांचे पुनर्वसन करणे या त्रि-सुत्रीवर मागील चार वर्षापासून कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय – मदतीशिवाय निरपेक्ष भावनेने अविरत कार्य करीत आहे.

कर्मयोगी संस्था एच.आय.व्ही.- एडस् संसर्गितांना मोफत समुपदेशन, एच.आय.व्ही. तपासणी, सीडी-4 तपासणी व उपचार, एआरटी औषधोपचारापूर्वीचे समुपदेशन व एआरटी औषधोपचार सुरु असतानाचे समुपदेशन, क्षयरोग व गुप्तरोग मोफत तपासणी व उपचार इ, संदर्भ सेवा मार्गदर्शन, सकारात्मक जीवनशैलीविषयीचे मार्गदर्शन, संसर्गितांच्या समस्या निवारणासाठी गृहभेटी, वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करणे, आधारात्मक काळजी घेणे. संसर्गित बालकांना पोषक आहार पुरविणे, एडस् संसर्गितांचे विवाह जुळवुन देणे, संसर्गितांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे, रेड रिबन वाचनालय, रेड रिबन फ्रेंडशिप ट्रॉफी, पॉझिटिव्ह साथी डॉट कॉमच्या (मा. श्री. अनिलकुमार वळीव) यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन विभाग व रेड रिबन कार्यालयात पॉझिटिव्ह बहुउद्देशिय केंद्र, हेल्थ सेल चालविणे, रेड रिबन ऑटो द्वारे संसर्गितांना व नातेवाईकांना मोफत प्रवास सेवा, (एच.आय.व्हीसह सहजीवन जगणा-या संसर्गित) महिलांसाठी रेड रिबन क्लब हे स्वाधार केंद्र, रक्तदान शिबिर, संसर्गित महिलांना शिलाई मशिनद्वारे प्रशिक्षण व स्वयंरोजगार निर्मिती केंद्र उपलब्ध करुन देणे. भविष्यात संसर्गित आर्थिक दुर्बल घटकांसाठी धान्य बँकेचा विस्तार करणे, संसर्गित लहान बालके व महिलांसाठी अनाथाश्रम सुरु करणे इ. उपक्रमाद्वारे संसर्गितांना पाठबळ व आधार देण्याचे विनामूल्य कार्य अखंड सुरु आहे.

सध्या संस्थेकडे 3500 हून अधिक संसर्गितांची नोंदणी झालेली आहे व सतत होत आहे. 100 हून अधिक गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल लहान संसर्गित बालकांची नोंदणी असून ही मुले एआरटी औषधोपचार, वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी वेळोवेळी एआरटी सेंटरला आल्यानंतर संस्थेच्या कार्यालयात येत असतात. संस्थेचे रेड रिबन कार्यालय एस.टी.स्टॅन्ड जवळ असल्याने थांबण्यासाठी, विरंगुळ्यासाठी, पोषक आहार घेण्यासाठी, जेवण्यासाठी, पुस्तकांचे वाचन करण्यासाठी जवळ पास 2 ते 3 तास थांबतात.

सध्या संस्थेला एका चार चाकी वाहनाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्या बहुउद्देशिय वाहनातून संसर्गित लहान मुलांना औषधोपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे विनामुल्य पोहचविणे व आणणे ही सेवा दिली जाईल. या नियोजित बहुउद्देशिय वाहनातून खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहिल.

हे बहुउद्देशिय वाहन फक्त एच.आय.व्ही. संसर्गित लहान बालकांसाठीच राखीव राहील. या वाहनातून बालकांना वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणे, ज्यामध्ये बगीचे, वॉटर पार्कस, सहलीचे ठिकाण, वस्तु संग्राहलय, मंदिरे, सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठीची मासिक भेट, विविध नामवंत शाळांना भेट तसेच विविध स्पर्धा परिक्षा ज्यामध्ये उन्हाळी, हिवाळी व पावसाळी शिबिरे, विविध परिसंवाद, मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे ऐकणे, आनंद मेळावा, अल्प कालावधीची प्रशिक्षण शिबिरे, हस्तकला, चित्रकला वर्ग, चित्रपट, नाटके पाहणे, मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेणे, इ. सुविधांसाठी बहुउद्देशिय वाहन उपयुक्त ठरणार आहे.

महोदय आमची आपणास नम्र विनंती आहे की संसर्गित बालकांसाठी हे बहुउद्देशिय वाहन त्यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक व आशेचा किरण ठरेल यात संशय नाही. संस्था करीत असलेल्या प्रयत्नामध्ये आपली साथ नक्कीच मिळेल याची संपूर्णतः खात्री आहे. संसर्गित बालकांच्या आयुष्यात आपण मिळुन त्यांना निर्भेळ आनंद देण्यासाठी एक अल्पसा प्रयत्न करु या ! बहुउद्देशिय वाहनाचे नाव – आपण सुचवाल ते नाव या बहुउद्देशिय वाहनास देण्यात येईल.

महेश हणमे
संस्थापक अध्यक्ष
कर्मयोगी विद्याविकास व सामाजीक बहुउद्देशिय संस्था
मोबाईल नं: ९८९०४४०४८०
ई-मेल: redribbonsolapur@gmail.com