Saturday, Dec 03rd

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्ही बाधित 386 रुग्णांचा पाच वर्षांत मृत्यू

एचआयव्ही बाधित 386 रुग्णांचा पाच वर्षांत मृत्यू

Print
सकाळ वृत्तसेवा
३० नोव्हेंबर २०१०
धुळे, भारत

शहरासह जिल्ह्यातील अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2006 ते 2010 या पाच वर्षात सात हजार 740 रुग्णांची जिल्हा रुग्णालय, ए. आर. टी. सेंटरमध्ये नोंद झाली. त्यापैकी 3 हजार 482 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जनजागृतीच्या उद्देशाने विविध कार्यक्रम जागतिक एड्‌स विरोधी जनजागृतीदिनानिमित्त एक डिसेंबरपासून आठवडाभर होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुळकर्णी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अप्पर जिल्हाधिकारी एस.एस. गुंजाळ, अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, डॉ. संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जे. एम. बोरसे, डॉ. एम. एम. अन्सारी, राजेश भोसले, डॉ. खान आदी उपस्थित होते. डॉ. कुळकर्णी, शिंदे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात दहा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र आहेत. तेथे गर्भवतींना स्वेच्छेने समुपदेशन केले जाते. जनजागृतीमुळे असंख्य बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाविद्यालयीन तरुण- तरुणी, ग्रामीण भागातील जनताही या आजाराविषयी माहिती जाणून घेत आहे. काही वर्षात चाचणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. महाविद्यालय, ट्रकचालक, महिला यांचेही मेळावे घेतले जात असल्याने शासकीय, निमशासकीय संस्थांचा त्यातील सहभाग वाढता आहे.

जनजागृतीपर कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे येथील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे एक डिसेंबरपासून जनजागृतीपर कार्यक्रम होतील. जिल्हा रुग्णालयातून सकाळी साडेआठला परिचारिकांसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक आयसीटीसी केंद्रातर्फे युवक- युवती मेळावा होईल. ट्रकचालक, स्थलांतरित कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी जनजागृतीपर मेळावा होईल.

श्री. गुंजाळ यांनी सांगितले, की एचआयव्ही बाधित पुरुषांसह महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपले जीवन जगत आहे. त्यातून समाजात एक चांगला संदेश जात आहे. आजाराकडे नैतिक- अनैतिकतेचा दृष्टिकोनातून न पाहता या बाधितांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. शासकीय स्तरावरूनही विविध योजना योग्य पद्धतीने राबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समुपदेशक बी. एम. पाटील, नितीन पाटील, सचिन शेवतकर, अमोल गोंधळी आदी उपस्थित होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya