Saturday, Dec 10th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार !

एचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार !

Print
सकाळ वृत्तसेवा
२२ नोव्हेंबर २०१०
बेळगाव, भारत

गरीब कुटुंबात एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले असल्यास त्यांना आधार देणारे कोणीच नसते. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती अशा मुलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी एचआयव्हीग्रस्त मुलांना मासिक आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती राज्यात इतर ग्रामपंचायतींना आदर्श ठरल्या आहेत. 100 ते 500 रुपये प्रमाणे या ग्रामपंचायतींनी ही मदत देऊ केली आहे.

एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना आवश्‍यक पौष्टिक आहार आणि प्रत्येक महिन्याला एआरटी औषध घेणे आवश्‍यक असते. पण, अशा गरीब मुलांना एआरटी औषध मिळविण्यासाठी महिन्याला 150 ते 200 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकदा एआरटी औषध घेण्यास सुरवात केल्यास ते कायम घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण गरीब मुलांना अथवा त्यांच्या पालकांना असे उपचार परवडणारे नाहीत. ग्रामीण भागातील जनतेमध्ये ही समस्या अधिक आहे. अशा कुटुंबांना ओळखून ग्रामपंचायतींनी मासिक आर्थिक साहाय्य देण्यास सुरवात केली आहे.

अभिनव उपक्रम
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रामपंचायतीने एचआयव्हीबाधित मुलांना मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. यासह अथणी तालुक्‍यातील कोकटनूर ग्रामपंचायत, संकोनट्टी ग्रामपंचायत, शिरगुप्पी ग्रामपंचायत, सौंदत्ती तालुक्‍यातील चचडी (पारसगड) ग्रामपंचायतींनी देखील मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांना उपचारासाठी आधार मिळाला आहे.

हुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रापंचायतीने ऑगस्ट 2010 मध्ये याबाबतच ठराव संमत करून 7 वर्षांच्या एचआयव्हीग्रस्त मुलाला मासिक 300 रुपये आर्थिक मदत देऊ केली आहे. चचडी ग्रामपंचायतीने 9 वर्षीय मुलाला 300 रुपयांची मासिक मदत, तर अथणी तालुक्‍यातील शिरगुप्पी ग्रामपंचायतीने दोघा मुलांना 200 रुपयांची मदत देऊ केली असून ही दोन्ही मुले एकाच मातेची आहेत. कोकटनूर ग्रामपंचायतीने 300 तर संकोनट्टी ग्रामपंचायतीने 500 रुपयांची मदत एचआयव्हीग्रस्त मुलांना देऊ केली आहे.

मासिक बैठकीत ठराव
एचआयव्ही ग्रस्त मुलांना मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीसाठी या ग्रामपंचायतींनी ठराव संमत केला आहे. पंचायतीच्या सभेत 2/3 बहुमताने हा ठराव स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे सहा महिने या ठरावात कोणालाही कोणताच बदल करता येत नाही. सहा महिन्यांनंतर हा ठराव रद्द करावयाचा असल्यास 2/3 बहुमतानेच ठराव रद्द करावा लागतो. त्यामुळे ठरावानुसार मुलांना आर्थिक निधी दर महिन्याला द्यावाच लागतो. ग्रामपंचायतीच्या निधीतून ही मदत देऊ करण्यात आली आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya