Monday, Dec 05th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीग्रस्तांची मुले "एचआयव्ही'मुक्त

एचआयव्हीग्रस्तांची मुले "एचआयव्ही'मुक्त

Print
सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
सातारा, भारत

एचआयव्हीग्रस्त माता-पित्याकडून अर्भकास होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी पीपीटीसीटी हा कार्यक्रम संजीवनी ठरत आहे. या उपक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील 134 नवजातांचा "एचआयव्ही'मुक्त जन्म झाला आहे.

संपूर्ण देशाप्रमाणे साताऱ्यातही एचआयव्ही बाधितांची संख्या धोक्‍याच्या पातळीवर आहे. या आजाराची बाधा झालेल्या व्यक्तीला संपूर्ण बरे करण्याचे औषध अद्याप शोधण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. अद्यापही प्रतिबंधात्मक उपायांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे या रुग्णांच्या होऊ घातलेल्या मुलांवरही शंभर टक्के मृत्यूचे सावट निर्माण झाले होते. एखाद्याचा संपूर्ण वंश संपुष्टात येण्याची भीती होती; परंतु "पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे "नेविरॅपिन' औषध अशा मुलांसाठी जीवनदायी ठरत आहे. या औषधाच्या मोफत उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. जुलै 2003 पासून या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय व कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात या केंद्राची सुरवात झाली.

जिल्हा रुग्णालयातील केंद्रामध्ये 2007 पासून जुलै 2010 पर्यंत 89 हजार 105 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. त्यात 712 महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे आढळले. त्यापैकी 274 महिलांची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. या महिलांपैकी 244 महिलांनी त्यांना व त्यांच्या मुलाला "नेविरॅपिन' औषध देण्यास संमती दिली होती. त्यानुसार "पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत समुपदेशन व नेविरॅपिन औषध देऊन होणाऱ्या अर्भकास एचआयव्हीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 18 महिन्यांनंतर त्यातील 151 बालकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ 17 बालकांनाच एचआयव्हीची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 134 बालकांना एचआयव्हीमुक्त जीवन देण्यात जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व समुपदेशकांना यश आले आहे.

प्रसूतिपूर्व दिल्या जाणाऱ्या सुविधा
- स्वच्छेने समुपदेशक व एचआयव्ही चाचणी
- पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन
- सुरक्षित बाळंतपणाबाबत घ्यायची काळजी
- स्तनपान व आहाराविषयी मार्गदर्शन
- कुटुंब नियोजनाविषयी मार्गदर्शन

योजनेचा लाभ कसा घ्यावा?
शासकीय रुग्णालयात रक्‍तचाचणी केलेल्या व एचआयव्ही बाधित असलेल्या महिलांना या कार्यक्रमात सहभागी होता येते. जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, तसेच खासगीमध्ये कृष्णा रुग्णालय (कऱ्हाड) व आर्यांग्ल रुग्णालय (सातारा) येथे या योजनेंतर्गत औषधे देण्यात येतात. बाळंतपणासाठी मात्र, जिल्हा रुग्णालयातच येणे आवश्‍यक असते.

18 महिने थांबण्याची आवश्‍यकता नाही
नेविरॅपिनच्या उपचारांना यश आले, की नाही हे पाहण्यासाठी पूर्वी 18 महिने थांबावे लागे. 18 महिन्यांनंतर रुग्णालयात तपासणीसाठी अनेक माता येत नव्हत्या. त्यामुळे किती बालकांना उपयोग झाला हे पूर्णत: समजत नव्हते. हे टाळण्यासाठी संबंधित बालकाचे रक्त घेऊन पुण्याला पीसीआर चाचणीसाठी पाठविण्याची सुविधा जिल्हा रुग्णालयातून करण्यात येते आहे. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर सव्वा व सहा महिन्यांनी अशा दोन चाचण्या केल्यावर मुले एचआयव्हीमुक्त आहेत, की नाहीत हे स्पष्ट होत आहे. "पीसीआर' चाचणीची ही सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya