Thursday, Dec 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एड्‌सग्रस्तांना आता युवकांचा आधार

एड्‌सग्रस्तांना आता युवकांचा आधार

Print
सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

एचआयव्हीबाधित आणि एड्‌सग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी, या रुग्णांविषयी समाजात चांगली भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक- युवतींना येत्या गुरुवारी (ता. 12) एड्‌सग्रस्तांचे संरक्षण करणारी शपथ दिली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी एड्‌सविषयी जनजागृती फेरी काढली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र नगरे आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. शेंडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

ही फेरी गुरुवारी सकाळी नऊ वाजता शनिवारवाड्यापासून निघेल. त्यानंतर ती फडके हौद, रास्ता पेठ, के. ई. एम. रुग्णालय, लाल देऊळ, या मार्गाने जाणार असून तिचा समारोप बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे. जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि एन. सी. सी. चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. महापौर मोहनसिंग राजपाल आणि जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ केला जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 12 ते 19 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी युवक मेळावे घेतले जाणार आहेत. यंदाच्या युवा दिनाचे घोषवाक्‍य हे "सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' असे आहे.

जिल्ह्यात सव्वासात हजार रुग्ण
एचआयव्हीबाधित व एड्‌सग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 42 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांत या केंद्रांमध्ये दोन लाख 18 हजार 790 संशयितांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 19 हजार 836 जण एचआयव्हीबाधित असल्याचे आढळले. यापैकी 924 गर्भवती आहेत. संशयितांपैकी चालू वर्षात (2010) लागण झालेले सात हजार 265 रुग्ण आहेत. त्यामध्ये 308 गर्भवतींचा समावेश असल्याचे डॉ. नगरे यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya