Saturday, Dec 10th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी 'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'

'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'

Print
पुढारी
०९ ऑगस्ट २०१०
सोमनाथ गर्जे
पुणे,भारत

’वेक-पुणे’ने दिला ३२ जणांना हक्काचा आधार
'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'
समाजात ’लिव्ह-इनरिलेशन’वर उलट-सुलट चर्चा झडत असताना, समाजशील प्राणी असलेल्या मानवाला एकमेकांच्या आधाराची किती गरज असते याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. त्यात एड्सग्रस्तही कसे मागे राहणार? जीवनात नकळत झालेल्या चुकीमुळे आपला जोडीदारच गमावून बसलेले 'एचआयव्ही'ग्रस्तही आपले उर्वरित आयुष्य आपल्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी धडपडत असतात पण त्यांना पैसेवाला, गाडी-माडीवाला नाही तर जोडीदार हवा असतो तो केवळ 'समजून घेऊन आयुष्याची वाट चालणारा...'

आयुष्यात नकळत, आज्ञानामुळे झालेल्या चुकांमुळे जीवनाचा जोडीदारच गमावण्याची वेळ अनेकांवर आली आहे. जोडीदाराप्रमाणेच आपल्या आयुष्याचीही रेषा फार लांब नाही, याची जाणीव त्यांनाही आहे, परंतु तरीही आपल्या हक्काच्या जीवनसाथीसोबत जगण्याची त्यांना अतिव इच्छा आहे. त्यांना केवळ स्वतःला समजून घेऊन बरोबरीने जीवनाची वाट चालणार्‍या जोडीदाराची गरज आहे. मग त्यापुढे जात-धर्म, प्रांत, भाषा आणि पैसा या सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत...

एचआयव्हीग्रस्तांना हक्काचा जोडीदार मिळण्यासाठी ’वेक-अप पुणे’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. वेक-अप ही विविध सहा स्वयंसेवी संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या स्वयंसेवी संघटनांची एकत्रित (शिखर) संस्था आहे. त्यांच्या वतीने एचआयव्हीग्रस्तांसाठी नुकतेच पुण्यात वधुवर-सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती वेक-अप, पुणे या शिखर संस्थेतील एक असणार्‍या ’आरोग्य डॉट कॉम’ या संकेत स्थळाचे संचालक आनंद शिंदे यांनी ’पुढारी’स माहिती दिली.

या मेळाव्यासाठी राज्यभरातून २२० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२३ पुरूष आणि ४२ महिला प्रत्यक्ष हजर राहिल्या. त्यामध्ये व्यावसायिक, अभियंते, खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे, सरकारी नोकर एवढेच नाही तर अनिवासी भारतीयांचाही समावेश होता. हे सर्वजण साधारणपणे २० ते ४५ या वयोगटांतील होते. त्यातील वीस जणांनी आपले जोडीदारही निश्‍चित केले आहेत. एवढेच नाही, तर लगेच लग्न करण्याचीही तयारी दर्शविली, परंतु काही कायदेशीर अडचणी असल्यामुळे संस्थेने त्यांना लगेच लग्नास परवानगी न देता आधी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड. असीम सरोदे यांची मदत घेण्यात येत आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर साधरणपणे एका महिन्यात त्यांचे लग्न होणे अपेक्षित आहे. तसेच मेळाव्यानंतर बारा जणांनी प्रत्यक्षात भेटून आम्हाला संबंधित मुलगा-मुलगी पसंत असून, आमच्या वतीने तुम्ही त्यांच्याशी बोलणी करा, अशी विनंतीही शिंदे यांना केली आहे.

एकूण ३२ जणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ’वेक-अप पुणे’ या संस्थेने मोठा हातभार लावला आहे. एकमेकांची पसंती झालेल्या दहा जोडप्यांनी एकत्र लग्न केले तर त्यांचा सर्व खर्च देण्याची तयारी ’पुणे जिल्हा युवा अग्रवाल संमेलना’चे अध्यक्ष अमित गोयल यांनी दर्शविली आहे.

शिंदे म्हणाले, एचआयव्हीग्रस्तांसाठी देशात प्रथमच एवढा मोठा वधू-वर सूचक मेळावा घेतला. एचाआयव्हीग्रस्त असूनही लग्नाबाबत त्यांच्या खुप अपेक्षा आहेत. एखाद्या ’विशिष्ट गटातील’ असल्यामुळे एवढ्या अवास्तव अपेक्षा केल्या, तर त्यांना जोडीदार मिळणेही शक्य होणार नाही. त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे तडजोड करण्याचा स्वभाव महिलांचाच असल्याचे येथेही स्पष्ट झालेले असून महिलांपेक्षा पुरूषांनी जास्त अपेक्षा केल्या आहेत. डॉ. विजय वारद आणि डॉ. राजेंद्र जगताप यांनी विवाह इच्छुकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतानाच त्यांच्या वैद्यकीय समस्या, उपचाराची स्थिती आणि एकूणच भावी आयुष्याबाबत समुपदेशन केले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya