Friday, Dec 09th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी दहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले ‘एचआयव्ही’ चे प्रमाण!

दहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले ‘एचआयव्ही’ चे प्रमाण!

Print
दहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले 'एचआयव्ही' चे प्रमाण!
‘एचआयव्ही’ चे राज्यात सर्वाधिक प्रमाण असणाऱ्यांपैकी पुण्या– मुंबईमधील बाधितांचे तीन वर्षांत प्रमाण घटले असले, तरी सांगलीमधील त्यांची संख्या अधिकच वाढली आहे. या शिवाय राज्यातील अन्य दहा जिल्ह्य़ांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा आणखी सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त होत आहे.

राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वाधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्य़ांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता. मात्र गेल्या २००४ ते २००६ या तीन वर्षांतील एचआयव्हीची राज्यातील जिल्ह्य़ांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एसएचआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले ७.७ टक्क्य़ांवरून हे प्रमाण ६.१ टक्क्य़ांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण सुद्धा १.६ टक्क्य़ांनी घटले असले तरी ते प्रमाण फार समाधानकारक आहे असे नाही.

या अहवालातून पुणे, मुंबई मध्ये सर्वाधिक असलेल्या प्रमाणात घट झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. म्हणजेच पुणे ७.७ टक्क्य़ांवरून ७.१ तर मुंबई ९.४ वरून ६.४ टक्क्य़ांपर्यंत प्रमाण घटले आहे. १३.२ वरून १६.७ टक्क्य़ांवर सांगली जिल्ह्य़ातील बाधितांचे प्रमाण पोहोचले आहे. या तीन वर्षांमध्ये सांगलीसह आणखी नऊ जिल्ह्य़ांमधील एचआयव्हीचे प्रमाण घटण्याऐवजी वाढत गेल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये धुळे, जळगाव, सांगली, औरंगाबाद, अकोला, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्य़ांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वाढले आहे. अन्य सुमारे वीस जिल्ह्य़ांमध्ये म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्य़ांमध्ये एचआयव्हीचे असलेले मूळचे प्रमाण हे या तीन वर्षांत खाली आल्याचे दिसते. मात्र नागपूर, गोंदिया, वर्धा या तीन जिल्हय़ांमध्ये असलेले बाधितांचे प्रमाण मात्र ‘जैसे थे’ असेच आहे.एचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) राज्यात विषाणू प्रतिबंधात्मक उपचार केंद्र (एआरटी), तपासणी व सल्ला मार्गदर्शन कें द्र, गर्भवती महिलांसाठी तपासणी याबरोबरच बाधित रुग्णांना मोफत औषधे, जनजागृती सारख्या मोहिमा देखील राज्यात राबविण्यात येत आहेत. तरीही बाधितांचे प्रमाण वाढल्याने ही यंत्रणा आणखी सक्षम करावी लागणार असल्याचा मतप्रवाह आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: Loksatta

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya