Friday, Dec 09th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी धुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक

धुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक

Print
धुळे - गुप्तरोग व एचआयव्हीबाधित तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रुग्णालयात एसटीडी क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत दोनशेपेक्षा अधिक रुग्ण गुप्तरोगाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व एड्‌स नियंत्रण सोसायटीतर्फे रुग्णालयामध्ये (ओपीडी क्रमांक 14) असुरक्षित शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या आजारावर (गुप्तरोग) उपचारासाठी एसटीडी क्‍लिनिक सुरू केले आहे. लैंगिक आजार व एचआयव्हीचा जवळचा संबंध आहे. लैंगिक आजार असणाऱ्या व्यक्तींने एचआयव्हीबाधित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची बाधा होण्याची शक्‍यता पाच ते दहा पटींनी वाढते. या आजाराची लक्षणे स्त्रिया व पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्यामुळे पेच वाढतो, यासाठी नैतिकता राखून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे चांगले असते; परंतु ज्यांना गुप्तरोग झालेला आहे. त्यांनी तपासणी करून उपचार करून घेणे केव्हाही चांगलेच असते. परंतु, अनेकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजार लपविल्यास तो वाढण्याची आणि पसरण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे आजार बळावत असल्याचेही दिसून आले आहे. काही आजार वेदनादायक, तर काही वेदनारहित असतात. त्यामुळे त्यांचे गांभीर्य अनेकांना समजत नाही. यापार्श्‍वभूमीवर रुग्णांना स्वतंत्रपणे व चांगले उपचार मिळावेत, आजाराविषयी माहिती मिळावी, यासाठी ही वैद्यकीय उपचार व्यवस्था देण्यात येत आहे. क्‍लिनिकमध्ये त्वचा व गुप्तरोग विभागप्रमुख डॉ. आर. टी. बागले, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. वैशाली गावंडे, डॉ. सुजाता सोनवणे यांच्यासह समुपदेशक प्रवीण सूर्यवंशी काम पाहतात.

महिला व पुरुषांच्या आजारांचे वर्गीकरणानुसार त्याला औषधीही पूर्णपणे मोफत देण्यात येतात. आजाराविषयी माहिती देणारे व आजाराचे परिणाम स्पष्ट करणारे जनजागृतीपर फलक, चित्रही क्‍लिनिकमध्ये लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना होत असलेल्या त्रासावरून त्याला काय आजार आहे, याची त्यालाही तत्काळ कल्पना येते. तसेच त्यासाठी काय काळजी घेणे आवश्‍यक आहे, याचीही माहिती आपोआपच मिळते. संशयास्पद असल्याने त्यातील काही रुग्णांची एचआयव्ही तपासणीही करून घेण्यात आलेली आहे. त्यातील 18 रुग्ण एचआयव्हीबाधित आढळले. गुप्तरोग असल्यास तो न लपविता तत्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करावी, योग्य ते उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद चपळगावकर यांनी केले आहे.

समुपदेशन केंद्राची व्यवस्था असंख्य रुग्ण लाजेखातर किंवा बोलण्यास संकोच बाळगतात, यासाठी क्‍लिनिकमध्ये समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. रुग्णाला स्वतंत्रपणे आजाराविषयी माहिती देऊन त्यांचे शंका-निरसन करण्यात येते. त्यामुळे स्त्री असो की पुरुष त्याला आजार बरा होण्यास चांगली मदत होते, अशी माहिती डॉ. बागले, डॉ. शिंदे यांनी दिली.

गुप्तरोगावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात येतात. त्यामुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, आजार लपविल्याने तो अधिक वाढतो. रुग्णांनी संकोच न बाळगता तपासणी करून औषधोपचार घ्यावेत.
- डॉ. आर. टी. बागले

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: सकाळ

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya