Monday, Dec 05th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी नवरात्रीत रंगणार आता "पॉझिटिव्ह' जागर!

नवरात्रीत रंगणार आता "पॉझिटिव्ह' जागर!

Print
सकाळ वृत्तसेवा
१४ ऑक्टोबर २०१०
मुंबई, भारत

एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण खूप वेगाने वाढत असले; तरीही या "पॉझिटिव्ह' लोकांविषयी सर्वसामान्यांच्या मनात अद्यापही अढी आहे. पॉझिटिव्ह लोकांविषयी असलेले अनेक उलटसुलट गैरसमज व एचआयव्हीचा नेमका प्रादुर्भाव कसा होतो, याची माहिती देण्यासाठी यंदा नवरात्रोत्सव मंडळांनी "पॉझिटिव्ह जागर' सुरू केला आहे. शहरांतील अनेक नामवंत नवरात्रोत्सव मंडळांनी या सोहळ्यानिमित्त एकत्र येणाऱ्या गरबाप्रेमींना एचआयव्हीबाबत नेमकी माहिती देण्यासाठी यावर्षीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. आदेश बांदेकरच्या मराठमोळ्या दांडियामध्येही यंदा "पालवी'सारख्या संस्था राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रीनंतर गर्भपातासाठी येणाऱ्या कुमारवयीन मुलींचे प्रमाणही वेगाने वाढते आहे, याबाबत काही ठोस आकडेवारी उपलब्ध नसली, तरीही हे प्रमाण वाढते असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुषा रेड्डी सांगतात. म्हणूनच या वेळी आरोग्यावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी या विषयावर; तसेच असुरक्षित संबंधातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्‍नांबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी नवरात्र मंडळांशी संपर्क साधून जनजागृतीचा उपक्रम यंदा राबविण्यात आला आहे.

महाराष्ट्र एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातूनही गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये हे उपक्रम राबविण्यात येतात. एचआयव्हीसह जगणाऱ्या माणसांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा, नव्या उपचारपद्धती, दृष्टिकोन बदलण्याची निकड, यासारख्या विविध गोष्टींवर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मंडळे जनजागृती करीत आहेत. दांडिया खेळण्यासाठी आलेली ही सारी युवा मंडळी "फेस्टिव्हल' मूड मध्ये असली, तरीही तीनेक मिनिटांसाठी या विषयांवर असलेल्या लघुनाट्याचा खूप मोठा प्रभाव होतो. एचआयव्ही नेमका काय आहे, याची माहिती अनेकांना असतेच; पण तो रोखण्यासाठी व टाळण्यासाठी काय करायला हवे, याचीही विचारणा त्या वेळी "ऍव्हर्ट'सारख्या संस्थेचे आरोग्यदूत करतात.

हे प्रश्‍न अनेकदा खूप मूलभूत असले, तरीही हा विषय समजून घेण्याची उत्सुकता मात्र त्यात दिसून येते, असा अनुभव दुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य विजय चौगुले सांगतात. यापूर्वी अनेक मंडळांचे सदस्य या "पॉझिटिव्ह' जागराबाबत फारसे उत्सुक नव्हते. आता मात्र हे प्रमाण वेगाने वाढीस लागले आहे, तेच या आरोग्य चळवळीतील "पॉझिटिव्ह' सूचक आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya